अमरावती - मागील काही वर्षांमध्ये रासायनिक खतांचा वापर मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. यावर्षी खतांचा वापर दुप्पट होण्याची चिन्हे आहेत. खतांचे दुष्परिणाम लक्षात आणून देणारी यंत्रणा तालुका व गावपातळीवर नसल्यामुळे शेतकरी अंधारात चाचपडत आहे. सामू (पीएच) वाढल्यामुळे भविष्यातील जमीन नापीक होण्याचा धोका टाळण्यासाठी ही यंत्रणा व माहिती गावपातळीवर पोहोचवण्याची गरज निर्माण झाली आहे.
शेतकर्यांच्या दृष्टीने बी. टी. तंत्रज्ञान, संकरित वाणांच्या विविध पिकांना तुलनेने अधिक रासायनिक खतांची गरज भासत आहे. शेतमालाच्या बाजारपेठेवर नियंत्रण नसल्यामुळे खर्चाच्या तुलनेत उत्पादनाला अल्प भाव मिळत आहे. यामुळे दरवर्षी तोट्यात जाणारी ‘बॅलन्स शीट’ नफ्यात आणण्यासाठी शेतकर्यांचा उत्पादन वाढीशिवाय पर्याय नाही. यातच बी.टी. कपाशीच्या वाणाची अन्नद्रव्याची भूक प्रचंड आहे. यासाठी रासायनिक खतांचा सुमार वापर वाढला आहे. अधिक उत्पादनासाठी खतांची गरज भागवण्यासाठी शेतकरी आटोकाट प्रयत्न करीत आहेत. तुलनेने खतांच्या किमती सुमार वाढूनही त्याचा वापर वाढला आहे; परंतु याचे दुष्परिणामही हळूहळू दिसून येत आहे.
रासायनिक खतांचे दुष्परिणाम
जागतिक संशोधनातून रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे उत्पादन कमी होऊ शकते, ही बाब पुढे आली आहे. याशिवाय गहू, तूर, मूग, आदी डाळवर्गीय पिकांतील काबरेदके व प्रथिनांचेही प्रमाण कमी होण्याची शक्यता असते. पोटॅशियमच्या अतिवापरामुळे भाजीपाला व फळातील व्हिटॅमिन सीच्या प्रमाणात घट होण्याची शक्यता असते. ज्या जमिनीवर या खतांचा वापर अधिक असतो, त्यावरील पिकांवर कीटक व रोगांचा प्रादुर्भावही अधिक होण्याची शक्यता असते.
पाण्याचे स्रोतही होतात दूषित
पिकांकडून शोषण न झालेले रासायनिक घटक जमिनीखालील पाण्यात मिसळून पाणी दूषित करतात. याचा दुष्परिणाम मानवासह इतर निसर्गातील घटकांवर मोठय़ा प्रमाणात होतात.
पिकांना हवे असते..
खतांच्या माध्यमातून पिकांना नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शिअम, मॅग्नेशियम, सल्फर हे घटक, तर बोरॉन, क्लोरीन, कॉपर, आयर्न, मॅंगनीज, झींक आदी सूक्ष्म अन्नद्रव्य पुरवले जाते.
युरिया व फॉस्फेटचा वापर सर्वाधिक
पिकांना सर्वाधिक युरिया व फॉस्फेटची गरज असते. परंतु यावर्षी खतांच्या किमती वाढल्याने शेतकर्यांनी डीएपी व संयुक्त खतांचा वापर कमी करून युरिया व फॉस्फेटचा वापर वाढवला आहे.