नागपूर - अधिवेशनाच्या आधी एका ठेकेदाराच्या विमानातून सहकुटुंब तिरुपती दर्शनाची वारी केल्याच्या आरोपावरून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार चांगलेच वादात सापडले आहेत. स्वत: त्यांनी या आरोपाचे खंडन केले असून मुख्यमंत्र्यांनीही त्यांचा बचाव केला आहे. ‘मुनगंटीवार यांच्या तिरुपती दर्शनाच्या विशेष विमानवारीचा खर्च भाजपने केला असून दुर्मिळात दुर्मिळप्रसंगी पक्ष अशा प्रकारची मदत करत असतो’, या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्र्यांचा बचाव केला. मात्र, त्यातून पक्ष एवढा खर्च कसा काय करतो, असा प्रश्नही निर्माण झाला आहे.
विधिमंडळ अधिवेशनाच्या आदल्या दिवशी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची ठेकेदाराच्या विमानातून सहकुटुंब तिरुपतीवारी केल्याचे आढळून आले. बुधवारी सकाळपासूनच विधान भवन परिसरात या विमानवारीची चर्चा सुरू होती. मुनगंटीवार यांनी रविवारी मुंबई- नागपूर- तिरुपती असा विमानप्रवास केला. त्या विमानानेच ते सोमवारी दुपारी नागपुरात परतले. सिंचन प्रकल्पाच्या ठेकेदाराचे ते विमान असल्याची चर्चा आढळून आली. मुनंगटीवार यांनी या प्रकारावर खुलासा करताना विमानवारीचा खर्च पक्षाने केला असल्याचा दावा केला.
ही चर्चा सुरूच असताना मुख्यमंत्र्यांनीही प्रसारमाध्यमांशी बोलताना विमानवारीचा खर्च पक्षाने केल्याचा दावा केला. ‘मुनगंटीवार यांची नियुक्ती तिरुपती देवस्थान ट्रस्टवर होणार आहे. त्यामुळे त्यांना तातडीने जाणे व परतणे अत्यावश्यक होते. त्यांनी यासंदर्भात
आपल्याशी चर्चाही केली होती. पक्ष दुर्मिळप्रसंगी अशा पक्षाची मदत करत असतो,’ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
महिनाभरात विशेष विमान?
दुष्काळावरील चर्चेत चौफेर फटकेबाजी करताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही विमानवारीचा विषय उपस्थित करून सत्तापक्षाला चिमटे काढले. सरकार येऊन जेमतेम महिना झाला, मंत्री स्पेशल विमान घेऊन तिरुपतीला काय जातात, असा सवाल पवारांनी उपस्थित केला. त्यावर सत्तापक्षाच्या काही सदस्यांनी ‘नवस फेडायचा होता, श्रद्धेचा विषय आहे दादा,’ असे सांगत बचावाचा प्रयत्न केला. अजितदादांनीही त्यामुळे हा विषय फार ताणला नाही.
आरोप चुकीचाच
तिरुपतीला तातडीने जाऊन पुन्हा अधिवेशनासाठी वेळेत परतणे आवश्यक होते. त्यामुळे विशेष विमान उपलब्ध करून द्यावे, अशी विनंती आपण मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यामुळे ठेकेदाराच्या मेहेरबानीवर तिरुपतीवारी केल्याचा आरोप योग्य नाही.
सुधीर मुनगंटीवार, अर्थमंत्री