आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूरच्या इमारतीत आगडोंब; कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- इमारतीच्या पार्किंगमध्ये आगडोंब उसळल्याने जीव वाचविण्यासाठी लिफ्टने खाली उतरत असलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला. नागपूरच्या गोकूळपेठ भागातील अजिंक्य प्लाझा इमारतीत गुरुवारी मध्यरात्री ही हृदयद्रायक दुर्घटना घडली. मृतांत तीन महिला व दोन बालकांचा समावेश आहे.

सलीला प्रकाश सिरिया (62), रागिणी निशांत सिरिया (27), नीराज निशांत सिरिया (4), र्शुती श्रीकांत माली (35) आणि शहाना श्रीकांत माली (2) अशी मृतांची नावे आहेत. परिवारातील एकमेव निशांत प्रकाश सिरिया हे बचावले.

गुरुवारी रात्री साडेबाराची वेळ. सिरिया-माली कुटुंब नुकतेच एका विवाह समारंभाहून परतले होते आणि झोपण्याच्या तयारीत होते. अचानक सोसायटीच्या चौकीदाराने दार ठोठावले. पार्किंगमधील गाड्यांना आग लागल्याची बातमी त्याने दिली. कुटुंबातील सहाही जण घाबरले. लगेच बाहेर आले. इमारतीतील इतर कुटुंबही जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळत होते. सिरिया-माली कुटुंबाला समोरच लिफ्ट दिसली. जीव वाचविण्याच्या प्रयत्नात ते तातडीने लिफ्टने तळमजल्यावर आले. समोर आगीचे तांडव सुरू होते.

निशांत यांनी लिफ्टचे चॅनल उघडले आणि समोरचा लाकडी दरवाजा सारत बाहेर पडले. आगीमुळे गाड्यांमध्ये स्फोट होत हेते, त्यामुळे सर्वजण घाबरले. निशांत यांच्या हातातून लिफ्टचा लाकडी दरवाजा सुटला. त्यामुळे दरवाजा लॉक झाला आणि परिवारातील इतर सदस्य लिफ्टमध्येच फसले. याच वेळी वायरिंग जळाल्याने लिफ्ट बंद पडली व लिफ्टच्या लाकडी दरवाजाने पेट घेतला. अग्निशमन विभाग आणि पोलिस पथक पोहोचेपर्यंत सर्व संपले होते. पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला होता.
अग्निशमन विभागाने आग विझवल्यानंतर लिफ्टचा दरवाजा तोडला असता लिफ्टमध्ये पाच जणांचे अक्षरश: कोळसा झालेले मृतदेह आढळले. निशांत सिरिया कुटुंबियांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत असताना जखमी झाले.