आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती शहरात बनला पहिला मेगा सुपर कॉम्प्युटर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - अभियांत्रिकी शिक्षणाच्या क्षेत्रात विख्यात असलेले अमरावतीचे डॉ. व्ही. टी. इंगोले यांनी तयार केलेल्या मेगा सुपर कॉम्प्युटरच्या संशोधनामुळे जगातील पहिला वेगवान गतीचा मेगा सुपर कॉम्प्युटर बनवण्याचे श्रेय भारताला मिळणार आहे. या कॉम्प्युटरच्या डिझाइनचे पेटेंट भारतात नोंदवले असून, आता या नोंदणीसाठी डॉ. इंगोले अमेरिकेला नुकतेच रवाना झाले आहेत.

मेगा सुपर कॉम्प्युटरच्या संशोधनामुळे संगणक क्षेत्रात क्रांती घडून येणार आहे. या कॉम्प्युटरचे वैशिष्ट्य म्हणजे या संगणकाची गती ही सध्याच्या संगणकापेक्षा अब्ज पटीने अधिक असणार आहे. शिवाय याला लागणारी वीज मदरबोर्डचा आकार हादेखील सध्याच्या मदरबोर्डपेक्षा कमी होणार आहे. इंटिग्रेटेड चिपच्या संख्येत घट होणार आहे. या मुळे या संगणकाची किंमतदेखील कमी होणार आहे. या संशोधनामध्ये अरथमॅटिक लॉजिकल युनिटवर लक्ष केंद्रित करून गणितातील आकडेमोड तर्कशास्त्रीय संबंधासोबतच विविध २१ नवीन कार्यपद्धतींवर काम करण्यात आले आहे. संगणकाचा मेंदू म्हणून संबोधलेल्या ए. एल. यू युनिटला अधिक गतिमान करण्याचा प्रयत्नही यामध्ये केला आहे. या पेटेंटनंतर या गतीपेक्षा जास्त गतीचा संगणक तयार करण्याचाही डॉ. इंगोले यांचा मानस आहे. डॉ. इंगोले यांच्या या नवीन संशोधनामुळे जागतिक पातळीवर भारतीय वैज्ञानिकांच्या बुद्धिमत्तेचा डंका वाजत असून, संपूर्ण जग भारताकडे आकर्षित होत आहे.

डॉ. इंगोले यांच्या नावे २३ पेक्षा जास्त पेटंट
डॉ.व्ही. टी. इंगोले यांच्या नावे २३ पेक्षा जास्त पेटंटची नोंदणी आहे. नवी दिल्लीच्या आय.ई.टी.ई. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनीअर्स या संस्थेच्या प्रतिष्ठित डॉ. बालीगा पुरस्काराने त्यांच्या इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील कार्याचा गौरव करण्यात आला आहे. डॉ. इंगोले हे ‘ग्रीन सर्कल’ या विज्ञान तंत्रज्ञानाशी संबंधित कार्य करणार्‍या केंद्राचे संस्थापक आहेत. आयबीएसएस अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी या बाबत माहिती दिली आहे.