आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहुजनवाद रुजल्याशिवाय सृजनवाद स्थापणे अशक्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा (ताराबाई शिंदे साहित्यनगरीतून)- सध्या विचारवंत सृजनवाद मांडताना दिसत आहेत. मात्र, जोपर्यंत देशात अभिजनवाद जिवंत आहे, तोपर्यंत सृजनवाद प्रस्थापित होऊ शकत नाही. हा अभिजनवाद संपवण्यासाठी बहुजनवादाची पाळेमुळे अधिक घट्ट करणे गरजेचे आहे. त्या अनुषंगानेच विद्रोही विचार जास्तीत जास्त जनमानसांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे, असे प्रतिपादन विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत पवार यांनी येथे केले.
येथील जिजामाता महाविद्यालयाच्या प्रांगणातील ताराबाई शिंदे साहित्यनगरीमध्ये १३ व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे उद््घाटन शनिवारी झाले. या वेळी ते बोलत होते. पवार म्हणाले की, आज देशातील सांस्कृतिक राष्ट्रवादाविरोधात मोठा संघर्ष उभा करण्याची गरज आहे, कारण या सांस्कृतिक राष्ट्रवादातून अंतिमत: मूलतत्त्ववाद निर्माण होतो. त्यातूनच अराजक निर्माण होऊ शकते. तसेच राज्यातील सत्तेसंदर्भात ते म्हणाले की, आजवर महाराष्ट्रात जरी बहुजनवादी सत्ताधारी झाले असले तरी केवळ यशवंतराव चव्हाण वगळता इतर कोणालाही बहुजनवाद समजला नाही. त्यामुळे सत्ताधारी बहुजनवादी असले तरी सत्ता मात्र वर्णवर्चस्ववादी
पद्धतीची राहिली.

यातूनच मोठ्या प्रमाणात बहुजनांचे शोषण झालेले आहे. मोदी सरकारच्या विकासवादी कांगाव्यावरही त्यांनी आपल्या भाषणात खरपूस टीका केली.

महात्मा फुलेंनी दिलेले आत्मभान जागृत ठेवा
आज मनुवाद बोकाळला आहे. संस्कृतीच्या नावावर सांस्कृतिक दहशतवाद निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. १९ व्या शतकात महात्मा फुलेंनी आपल्यातील जागृत केलेले आत्मभान आजच्या काळातही वापरण्याची गरज आहे, असे प्रतिपादन विद्रोही सांस्कृतिक चळवळीची भूमिका स्पष्ट करताना प्रा. प्रतिमा परदेशी यांनी केले. दरम्यान, सध्याची परिस्थिती तशी आहे. त्यामुळे १३ वे साहित्य संमेलन हे महात्मा फुलेंनी जागृत केलेल्या आत्मभानाचे प्रतीक बनले आहे. त्यामुळेच विषमतेच्या बेड्या, ब्राह्मणीवाद, पुरुषसत्ताकवादाच्या बेड्या लेखणीच्या साहाय्याने तोडून या संमेलनाचे आपण उद्घाटन केले.