आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Five Dreaded Criminals Escape From Nagpur Jail, SP Suspended

फरारी कैद्यांचे मदतनीस दोन संशयितांना अटक, ११ जणांवर कारवाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - मध्यवर्ती कारागृहातून सोमवारी मध्यरात्री पाच कुख्यात कैद्यांना पळून जाण्यात मदत करणार्‍या दोन संशयितांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. नवाब शाहेद खान गणेश कमलकिशोर शर्मा अशी त्यांची नावे असून हे दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत.

दरम्यान, या कारागृहात भ्रष्टाचार बोकाळण्यास कारणीभूत असलेल्या दोन वरिष्ठ तुरुंगाधिकार्‍यांना अतिरिक्त पोलिस महासंचालक (तुरुंग) मीरा बोरवणकर यांनी सोमवारी निलंबित केले. आतापर्यंत नागपूर कारागृहाचे अधीक्षक वैभव कांबळेसह ११ जणांना निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यात तुरुंगाधिकारी आर. जी. पारेकर, एस. यू. महाशिकरे, शिपाई मंगेश पन्नालाल प्रजापती, राजु रामभाऊ पाटील, संजय मधुकर ठोकळ, रमेश काशिनाथ ढेकले, अशोक नत्थुजी भांडारकर आणि एका होमगार्डचा समावेश आहे.

पाच कैदी फरार होऊन एक आठवडा उलटला तरी अद्याप त्यांचा माग काढण्यात पोलिसांना यश आले नव्हते. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित केली जात होती. मात्र सोमवारी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतल्याने तपासाला आता गती येण्याची आशा निर्माण झाली आहे. काही महिन्यांपूर्वी चोरी प्रकरणात नवाब गणेश यांना अटक करण्यात आले होते. या दोघांनाही नागपूरच्या कारागृहात फरार पाच कुख्यात गुंडांसमवेत बंद करण्यात आले होते. या पाचही जणांचे तेव्हापासूनच कारागृहातून पळून जाण्याचे प्रयत्न सुरू होते. त्याची गणेश नवाब दोघांनाही कल्पना होती. दरम्यान, सात महिन्यांपूर्वी शिक्षेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर या दोघांची कारागृहातून सुटका झाली. मात्र त्यानंतरही कुख्यात पाच कैद्यांशी या दोघांचा मोबाइलवरून संवाद सुरू होता.

कारागृहातील कर्मचार्‍यांच्या ‘आशिर्वादाने’ या कुख्यात कैद्यांना मोबाइल फोन उपलब्ध होत होते. तुरूंगातून पळून जाण्याचा कट रचल्यानंतर या पाचही आरोपींनी गणेश नवाब यांच्याशी संपर्क साधून पळून जाण्यासाठी त्यांची बाहेरून मदत मागितली. या दोघांनीही त्यांना मदत केल्याचा पोलिसांना संशय आहे. दरम्यान, सोमवारी सायंकाळी नागपुरातील माणकापूर परिसरातून पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे. आता त्यांच्याकडील चौकशीत फरार आराेपींची माहिती उजेडात येण्याची शक्यता आहे.

दोघांवर कारवाईचे आदेश आले फॅक्सने
सोमवारी पुणे येथून अतिरिक्त पोलिस महासंचालक मीरा मोरवणकर यांचा फॅक्स पोलिस उपमहानिरीक्षक शशिकांत शिंदे यांना प्राप्त झाला. त्यात वरिष्ठ तुरुंगाधिकारी वैभव आत्राम आणि कारागृहाच्या अंतर्गत सुरक्षा विभागाचे प्रमुख वरिष्ठ तुरुंगाधिकारी अशोक मलवाड यांना निलंबित केल्याचे नमूद होते. शिंदे यांनी तातडीने या आदेशाची अंमलबजावणी केली. मंगळवारी आणखी दोन अधिकारी, कर्मचार्‍यांचे निलंबन होण्याची चर्चा कर्मचार्‍यांमध्ये आहे.

अब तक ४७
कारागृहातकिती मोबाईल आहेत, याची आकडेवारी कोणीही निश्चित सांगू शकत नाही. सोमवारी घेतलेल्या शोध मोहिमेत १२ मोबाईल आणि एक वस्तरा सापडला. त्यापैकी चार मोबाईल हे जमीनीत पुरुन ठेवलेले होते. गेल्या चार दिवसात सापडलेल्या मोबाईलची संख्या ४७ वर पोहोचली आहे.

अधीक्षक वैभव कांबळे यांच्यानंतर वरिष्ठ तुरुंग अधिकारी वैभव आत्राम हा नागपूरच्या कारागृहातील दुसर्‍या क्रमांकाचा अधिकारी होता. आजवर कांबळे याने कारागृहात जे काही गैरव्यवहार केले ते आत्राममार्फतच चालायचे, अशी माहिती सूत्रांनी दिली. आत्रामने गेल्या नवरात्र उत्सवात ते फूट उंचीच्या दोन दुर्गा मूर्तींची कारागृहात स्थापना केली होती. तुरुंग नियमानुसार कारागृहात कोणत्याही प्रकारची मूर्ती बसविता येत नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मूर्तींच्या आतमध्ये दारु, गांजा, चरस, मोबाइल आणि शस्त्र तुरुंगात पोहोचविण्यात आले होते. या दोन्ही मूर्ती खास कैद्यांच्या बराकींमध्ये बसविल्या होत्या, हे विशेष.