आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्लॅट संस्कृतीत भंगले घराचे स्वप्न; लोकसंख्या 11 लाख पण स्वमालकीची घरे मात्र सव्वा लाख

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- ‘घर असावं घरासारखं, नकोत नुसत्या भिंती’ या कवितेत वर्णन केल्याप्रमाणे ‘छोटंसं घरटं असावं’ असे प्रत्येकाचं स्वप्न असते; पण महागाईच्या युगात आकाशाला भिडलेले जागेचे भाव, बांधकामाच्या अटी व शर्ती, त्यासाठी घ्यावे लागणारे हेलपाटे आणि एफएसआयचा दर यामुळे अमरावतीमध्ये फ्लॅट संस्कृतीने जोर धरला आहे. त्यामुळे आपआपल्या स्वहक्काच्या घराचे स्वप्न आता मागे पडू लागले आहे.
सुमारे 11 लाख लोकसंख्या असलेल्या अंबापुरीत केवळ एक लाख 26 हजार लोकांकडेच स्वत:ची घरे आहेत. अमरावतीच्या एफएसआयचे दर आणि परवान्यांसाठी भरावी लागणारी रक्कम, यामुळे लोक स्वत:चं घरटं उभारण्यापेक्षा बहुमजली अपार्टमेंटमध्ये राहायला जाणे अधिक पसंत करीत आहेत. त्यामुळे सीमेंटच्या जंगलात बहुमजली घरांची संख्याही वाढत आहे.
एफएसआय दराचा परिणाम?
अमरावती शहराचा एफएसआय एक टक्के आहे. गावठाण भागात बांधकाम करायचे असल्यास एफएसआयचा दर 1.5 टक्के आहे. व्यावसायिक आणि निवासी अशा मिर्श स्वरूपाच्या बांधकामासाठी एफएसआयचा दर दोन टक्के आहे. त्यामुळे एखाद्याला स्वत:चं घर उभारायचे म्हटले, तर भूखंडाच्या एकूण क्षेत्रफळाच्या किमान 45 टक्के जागा सोडून उर्वरित जागेवर बांधकाम करावे लागते. त्यामुळे कमी जागेत जास्त बांधकाम करण्याची किंवा दुमजली इमारत उभारण्याची कसरत लोकांना करावी लागते. त्याचा परिणाम छोट्या घरांचं बांधकाम करणार्‍यांना भोगावा लागत आहे.
मिश्र बांधकामाला प्राधान्य
तळमजल्यावर काही दुकाने आणि वरील सर्व मजल्यांवर फ्लॅट असे निवासी व्यावसायिक संकुल उभारायचे असेल, तर त्यासाठी 2 टक्के एफएसआय आहे. त्यामुळे जागेची सूट मिळवण्यासाठी मिर्श बांधकाम वाढतच आहे. एफएसआयची अट असल्याने भूखंड खरेदी करून त्या जागेवर बांधकाम करता येत नाही. या उलट एफएसआयची अट शिथिल असल्याने मिर्श बांधकाम केलेल्या फ्लॅटला मागणी आहे.
घराचे स्वप्न मोडतेय
एफएसआयचा दर केवळ एक टक्केअसल्याने लोकांना भूखंडाचा बराचसा भाग सोडावा लागतो. त्या 50 टक्के जागा सुटते. जास्त उंच इमारतही उभारता येत नाही. त्यामुळे स्वत:च्या घराचे अमरावतीकरांचे स्वप्न मोडतेय.
-मिलिंद काहाळे, वास्तुशास्त्रज्ज्ञ व अभियंता

तुलनात्मक माफक दर
इतर शहरांच्या तुलनेत अमरावतीमध्ये घराची उभारणी माफक आहे. बांधकामापूर्वी योग्य नियोजन होणे गरजेचे आहे. --अरुण डोंगरे, मनपा आयुक्त
फ्लॅटला प्राधान्य
एफएसआय, शुल्क आदी सर्व दर शासन ठरवते. अलीकडच्या काळात घर बांधण्यापेक्षा लोकांचा फ्लॅटकडेच ओढा आहे. -गिरीश आगरकर, सहायक संचालक, नगररचना