नागपूर - महाराष्ट्रात दर कोसावर केवळ भाषाच नाहीतर खाण्याच्या पद्धती, रीती-रिवाज आणि संस्कृतिही बदलते. विदर्भ, मराठवाडा, कोकण, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र असे प्रदेेशनिहाय खाणे बदलत जाते. पदार्थांची रेसीपी सारखी असली तरी नावे बदलत जातात. खाण्यावरून त्या त्या प्रदेशाची संस्कृती आणि समृद्धीची ओळख होते. ही ओळख महाराष्ट्राच्या घरोघरी जावी म्हणून शासनाच्या सांस्कृितक व पुरातत्त्व िवभागाने पुढाकार घेतला आहे. शासनातर्फे महाराष्ट्रीयन खाद्यकोशाची निर्मिती हाती घेण्यात आली असून येत्या दोन महिन्यात हा खाद्यकोश खाद्य शौकिनांसाठी उपलब्ध होईल, अशी माहिती सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी दिली.
या खाद्य काेशासाठी विष्णू मनोहर यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून खाद्य पदार्थांचे संकलन व लेखन केले आहे, तर अनुपमा उदगरे यांनी त्या त्या प्रदेशातील संस्कृती व रीतीरिवाजांविषयी लिहिले आहे. वैश्विक खाद्यसंस्कृती असे या कोशाचे नाव आहे. माणूस या ना त्या कारणाने स्थलांतरित होतो. जाताना
आपली खाद्य संस्कृतीही घेऊन जातो. दोन खाद्य संस्कृतीच्या मिलाफातून नवनवीन पदार्थ तयार होतात, असे विष्णू मनोहर म्हणाले. या खाद्य कोशात वालातील मुठे, मोदकाची आमटी, मधाचे चिरोट व इतर पदार्थांचा समावेश आहे.
मराठवाड्यातील २६० पदार्थाचा समावेश
या खाद्य कोशात गुजरातच्या सीमेवरील शहादाजवळ असलेल्या गुजरी येथील २२५, अहिराणी ३००, पश्चिम महाराष्ट्रातील ३२०,विदर्भातील २८०, मराठवाडा २६०, कोकण ३०० च्या वर, तळकोकण २२५, मध्य महाराष्ट्रातील ४२५, खानदेशातील ३०० खाद्यपदार्थाचा समावेश आहे. यात सर्वाधिक मांसाहारी पदार्थाचा समावेश आहे. पाठारे प्रभू वा सीकेपी यांच्या ५२५ मांसाहारी पदार्थाचा समावेश आहे.