आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Foodgrains Distribution Systm To Be Constituncies Wise Minister Bapat

यापुढे मतदारसंघनिहाय अन्नधान्य वितरण व्यवस्था - अन्न व नागरी पुरवठामंत्री बापट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - सध्या झोननिहाय अन्नधान्य वितरण व्यवस्था आहे. मात्र, त्यामुळे एकाच कामासाठी प्रसंगी दोन-तीन झोन कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. हे हेलपाटे कमी व्हावे यासाठी यापुढे विधानसभा मतदारसंघनिहाय वितरण व्यवस्था उभारण्यात येईल, अशी माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.

आज राज्यातील पुरवठा खात्याचा कारभार उधारीवर चालतो आहे. पुरवठा खाते स्वत:च्या पायावर उभे राहाण्याऐवजी महसूल खात्याच्या मदतीवर अवलंबून बसले आहे. पुरवठा खात्याचा कारभार स्वतंत्र असावा म्हणून विरोधी पक्षात असताना मी स्वत: प्रयत्न केले. विधानसभेत तारांकित प्रश्न व लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्न लावून धरला. आता मीच या खात्याचा मंत्री असल्याने मुख्यमंत्र्यांशी बोलून खाते लवकरात लवकर स्वतंत्र कसे करता येईल यावर तोडगा काढेन, असे बापट यांनी स्पष्ट केले.

पुरवठा विभागात राज्यात ४,७२१ कर्मचारी आहेत. त्यापैकी पुरवठा विभागाचे म्हणून नागपूर विभागात ३१४ व अमरावती विभागात ६३ अशी ३७७ कर्मचा-यांची भरती
करण्यात आली.

अजूनही ४३४४ कर्मचारी महसूल विभागाचे आहे, याकडे बापट यांचे लक्ष वेधले असता यासंबंधी माहिती घेतो. मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यावर जाहीरात देऊन कर्मचारी भरती करण्यात येईल, असे बापट यांनी स्पष्ट केले.

महामंडळ माहिती नाही
अन्न सुरक्षा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मध्य प्रदेश व छत्तीसगड या भाजपशासित राज्यात नागरी सुरक्षा महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. एपीएलला देण्यात येणा-या धान्य पुरवठ्याला मुदतवाढ न मिळाल्याने हा पुरवठा बंद झाला आहे, याकडे लक्ष वेधले असता बापट यांनी याविषयी मला काहीच माहिती नाही. नेमके काय आहे, याची माहिती घेतो, असे सांगितले.