आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौथा भिडू नकोच, मनसेचा विषय आता संपला! नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर -राज्यातील कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडीचे भ्रष्ट सरकार हटवायचे असेल तर विरोधी मतांचे विभाजन होता कामा नये. त्यासाठी सर्वच विरोधी पक्षांची एकजूट करण्याच्या भावनेतून मनसेला सोबत घेण्याचे प्रयत्न भाजपकडून करण्यात आले. मात्र, शिवसेना त्यासाठी तयार नाही व मनसेचीही सोबत येण्याची तयारी नाही. त्यामुळे यापुढे महायुतीत मनसेला सहभागी करून घेण्याचा विषय संपला आहे, असे स्पष्टीकरण भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी खास ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिले.
राष्ट्रीय व राज्यातील राजकारणावर गडकरी यांनी स्पष्टपणे आपली मते मांडली. महायुतीत मनसे सहभागी होण्याबाबत शिवसेना व मनसे या दोन्ही बाजूंनी ना आहे. त्यामुळे आता हा विषयच संपुष्टात आला आहे. आगामी निवडणुकांमध्ये जे व्हायचे ते होईल, त्याची चिंता करण्याची गरज नाही, असेही गडकरी यांनी ठामपणे सांगितले.
गुरुवारी नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत प्रदेश भाजपची बैठक झाली त्या वेळी गडकरी यांची अनुपस्थिती होती. याबाबत विचारले असता ते म्हणाले की, मी शनिवारपासून नॉर्वेच्या दौºयावर जात आहे. त्यासाठी व्हिसासंबंधीचे दस्तऐवज तयार करण्यासाठी मी गुरुवारी दिल्लीत नॉर्वेच्या दूतावासात गेलो होतो. दुपारनंतर परत आलो. सायंकाळी एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात मोदींसह उपस्थितही होतो. त्यामुळे माझ्या अनुपस्थितीमागे कुठलेही राजकीय कारण नाही, असे गडकरींनी सांगितले.

मोदी लोकप्रिय नेते
नरेंद्र मोदी हे लोकप्रिय नेते आहेत. त्यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून जाहीर करायचे काय ? याबाबतचा निर्णय भाजपचे संसदीय मंडळ घेणार आहे. त्यावर योग्य वेळी निर्णय होऊ शकतो. हा निर्णय पक्षांतर्गत स्वरूपाचा असल्यामुळे त्याची प्रसार माध्यमांमध्ये चर्चा व्हायला नको, अशी अपेक्षाही गडकरी यांनी नमूद केली.

संघाचा हस्तक्षेप नाहीच
अडवाणी यांचा मोदींच्या नावाला विरोध नाहीच. काही मुद्द्यांवर आक्षेप असल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला होता. अडवाणी ज्येष्ठ असल्याने त्यांच्याशी कोणी बोलायचे, असा प्रश्न होता. त्यामुळे सरसंघचालकांनी त्यांच्याशी चर्चा केली. याचा अर्थ संघाचा हस्तक्षेप होतो असा नाही, असा दावाही गडकरी यांनी केला.

भाजपत गटबाजी नाहीच
राजकारणाचे क्षेत्र किचकट आहे. अशात आपण कशा प्रकारे राजकारण करायचे, हे मी निश्चित केले आहे. मी कधीही गटबाजी, द्वेष केला नाही. स्वत:च्या कारकीर्दीची रेषा मोठी करताना दुसºयाची पुसायची नाही, हे पथ्य मी सातत्याने पाळले आहे, असे सांगून गडकरी यांनी भाजपत गटबाजी नसल्याचा पुनरुच्चार केला.