नागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच नागपूर शहरात सोमवारपासून होणारे सरकारचे पहिलेच हिवाळी अधिवेशन अनेक मुद्द्यांवरून गाजण्याची चिन्हे आहेत. मराठवाडा-विदर्भातील दुष्काळी स्थिती, पाणीटंचाई, शेतक-यांच्या आत्महत्या यासह शेतमालाचे भाव, विजेचा प्रश्न असे मुद्दे सरकारची परीक्षा पाहणारे ठरतील. शिवाय जवखेडा हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर दलितांवरील वाढत्या अत्याचारांवरूनही रणकंदन होण्याची शक्यता आहे.
काँग्रेसने तर सरकारला घेरण्याची पूर्ण तयारी केली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी रविवारी नागपुरातील पत्रकार परिषदेत पक्षाची तशी भूमिकाही स्पष्ट केली. दुष्काळग्रस्तांसाठी पॅकेज घेतल्याशिवाय काँग्रेस स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. केंद्राच्या मदतीच्या आशेवर ठेवत राज्य सरकारने कोणतीही मदत शेतक-यांना केली नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. पहिल्याच दिवशी सोमवारी काँग्रेस काढणार असलेला शेतक-यांचा हल्लाबोल मोर्चाही विधान भवनावर धडकणार आहे.
या मुद्द्यांवर सरकारची कसोटी
- मराठवाडा व विदर्भातील दुष्काळी परिस्थिती
- वाढत्या शेतकरी आत्महत्या
- मराठवाड्यातील पाण्याचा प्रश्न
- दलितांवरील वाढते अत्याचार
- ऊस दर वाढवून मिळणे, कापूस खरेदीचा व दराचा प्रश्न
- वीजटंचाई, भारनियमन व विजेचे वाढीव दर
- नक्षलग्रस्त भागातील धिमा विकास
- पश्चिम विदर्भातील सिंचन