आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gadkari Support Special Committee For Mumbai, After Pawar Letter Issue Burn

मुंबईसाठीच्या समितीला गडकरींचेही समर्थन, पवारांच्या पत्रानंतर विषय तापला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - मुंबईच्या विकासासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्र लिहून विरोध केला असताना भाजप नेते व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनीही पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील समितीला समर्थन देऊन वाद पेटवला आहे. नागपुरातील प्रस्तावित एम्स, मेट्रो व प्रादेशिक क्रीडा संकुल निर्माण करण्यासंबंधी आयोजित बैठकीसाठी विधिमंडळात आले असता त्यांनी माध्यमांकडे आपली भूमिका मांडली.

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमणे म्हणजे मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असल्याची टीका करीत विरोधकांनी समितीला विरोध केला होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी तर गुरूवारी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून समिती स्थापन करण्यास विरोध दर्शवला होता. तसेच पंतप्रधानांनी समितीचे अध्यक्षपद स्वीकारू नये, असे आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर गडकरी यांनी समर्थन करून भाजपचा इरादा स्पष्ट केला आहे. ‘मुंबईच्या विकासाच्या अनेक फाइल्स केंद्राकडे मंजुरीसाठी वर्षानुवर्षे पडून आहेत.
पंतप्रधान समितीचे अध्यक्ष झाल्यास या फायलींना मंजुरी मिळून मुंबईच्या विकासाला गती येईल. स्वत: पंतप्रधानच लक्ष घालणार म्हटल्यावर फाइल्स थांबणार नाहीत. यात मुंबईच्या स्वायत्ततेवर घाला घालण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही,’ असे गडकरींनी स्पष्ट केले.
दरम्यान, ‘पाण्यावर उतरणारे विमान आले आहे. पण विदेशात पाण्यावर चालणारी वाहनेही आली आहेत. अशा काही वाहनांचे सादरीकरण आपण पाहिले असून महाराष्ट्रातही अशी वाहने आणण्याचा आपला प्रयत्न आहे. मुंबई ते गोवा तसेच कोकणात याचा फायदा होईल. यामुळे भूपृष्ठ वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल,’ असे गडकरी म्हणाले.