वरुड - अस्मानी आणि सुलतानी संकटांनी वेढलेल्या गारपीटग्रस्त शेतकर्यांना अद्यापही अनुदान मिळाले नाही. गारपीटग्रस्त शेतकर्यांच्या खात्यांमध्ये तातडीने अनुदान जमा करावे; जेणेकरून त्यांना बी-बियाणे, खते खरेदी करता येतील, अशी मागणी तालुका युवक काँगे्रसच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य विक्रम ठाकरे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी तहसीलदार राम लंके यांना नुकतेच निवेदन सादर केले.
जून ते सप्टेंबर 2013 मध्ये झालेल्या अतिवृष्टीत खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले, तर जानेवारी ते मार्च 2014 मध्ये वादळ आणि गारपिटीच्या तडाख्यात गहू, संत्रा, हरभरा आदी पिकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले होते. आता जून महिना संपत आला, पाऊस मात्र ‘गायब’च झाला आहे. त्यामुळे शेतकरी चोहोबाजूंनी कोंडीत अडकला असून, त्यांच्यासमोर कुटुंबीयांचा उदरनिर्वाह आता चालवायचा कसा, असा प्रश्न उभा ठाकला आहे. गारपीटग्रस्त शेतकर्यांसाठी शासनाने अुनदान घोषित केले होते. संबंधित तहसील कार्यालयाला ते प्राप्तसुद्धा झाले आहे. त्यानुसार, लाभार्थ्यांच्या याद्या तयार करून बँकांकडे पाठवण्यात आल्या. मात्र, यात दिरंगाई होत असल्याचे कार्यकर्त्यांनी तहसीलदार लंके यांच्या निदर्शनास आणून दिले.
निवदेन देताना जिल्हा परिषद सदस्य विक्रम ठाकरे, मोर्शी विधानसभा युवक काँगे्रसचे अध्यक्ष धनंजय बोकडे, स्वप्नील खांडेकर, बाजार समितीचे संचालक तुषार निकम, राहुल चौधरी, दिनेश आंडे, वसंत निकम, किशोर भोसले आदी कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.
बँकेत रक्कम जमाच नसल्याची मिळतात उत्तरे
लाभार्थ्यांच्या याद्या तयार करून बँकांकडे पाठवण्यात आल्यात; परंतु बँक खात्यांमध्ये अनुदानाची रक्कम जमाच झालेली नसल्याची उत्तरे बँकांकडून मिळत असल्याचे तालुक्यातील काही शेतकर्यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.