आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gas Pipeline Go Through Vidarbh, Khandesh, Prafulla Patel Informed

विदर्भ, खान्देशातून जाणार गॅस पाईपलाईन, प्रफुल्ल पटेल यांची माहिती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - केंद्र सरकारची कंपनी असलेल्या गेल कंपनीची सुरत-पारादीप नॅचरल गॅस पाईपलाईन महाराष्ट्रात विदर्भ आणि खान्देशमार्गे जाणार असल्याने गॅस आधारित उद्योगांना चालना मिळेल तसेच घरगुती गॅस ग्राहकांना भविष्यात मोठा दिलासा मिळेल, अशी माहिती केंद्रीय अवजड उद्योग मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी नागपुरात दिली.
गेल्यावर्षीच गेलला परवानगी मिळाली असून काम सुरू झाले आहे. साडेचार हजार कोटींचा हा प्रकल्प येत्या 4 ते 5 वर्षात पूर्ण होणार आहे. ही पाईप लाईन धुळे-जळगाव-अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा या मार्गाने जाणार असल्याने या संपूर्ण भागात गॅसवर आधारित उद्योग वाढू शकतील. सुमारे 1540 किलो मीटरची पाईपलाईन महाराष्ट्रासह गुजरात, छत्तीसगड, ओरिसा असा चार राज्यातून जाणार आहे. या पाईपलाईनचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात दोन्ही बाजुंनी गॅसचा पुरवठा करण्याची सोय राहणार आहे. त्यामुळे देशांतर्गत उत्पादित गॅस आणि आयात होणाऱ्या गॅस पुरवठय़ालाही वाव राहणार असल्याचे पटेल यांनी स्पष्ट केले. या गॅसवर आधारित खते, वीज प्रकल्पांना या पाईपलाईनचा फायदा होणार आहे. याशिवाय घरगुती गॅस ग्राहकांनाही स्वस्त पर्याय उपलब्ध होऊ शकेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. वर्धा, नागपूर, गोंदिया परिसरात उद्योगांची गरज लक्षात घेऊन काही उप वाहिन्यांची शक्यताही तपासून पाहिली जात असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकल्पावर काम सुरु करण्यासाठी गेलने नागपुरात कार्यालय सुरु केल्याचे त्यांनी नमूद केले.
टास्कफोर्स स्थापन
या गॅसपाईप लाईनमुळे मध्य भारतातील औद्योगिक विकासाच्या अधिकाधिक शक्यता तपासून पाहण्यासाठी अवजड उद्योग मंत्रालयाच्या वतीने एक टास्क फोर्स स्थापन करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली.