आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मायबाप प्रेक्षकास नाटक आवडणे महत्त्वाचे - गिरीश कर्नाड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - ‘आपल्या मनातील विचारांना आकार द्यायचा असतो, म्हणून नाटककार लिहितो, पण आपण लिहिलेले नाटक प्रेक्षकांना आवडले नाही तर नाटक अयशस्वी झाले म्हणून समजावे,’ असे स्पष्ट मत ख्यातकीर्त नाटककार व अभिनेते गिरीश कार्नाड यांनी रविवारी व्यक्त केले. विदर्भ साहित्य संघाला नव्वद वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित प्रकट मुलाखतीत ते बोलत होते. सुप्रसिद्ध निवेदक अजेय गंपावार यांनी त्यांच्याशी संवाद साधला. कार्नाड यांची मते त्यांच्याच शब्दांत...

अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, लेखक अशा विविध स्तरांवर मी काम केले. पण लेखन हा माझा आत्मा होता. त्याशिवाय राहू शकलो नसतो. लेखनाचा वेळ मी अभिनयासाठी दिला असता तर चिक्कार पैसा कमावला असता, पण समाधान मिळाले नसते. माझे सर्वोत्तम अजून यायचे आहे. त्यामुळेच तर मी अजूनही लिहितोच आहे. कुणाला देण्यासाठी नव्हे, तर मी माझ्यासाठी लिहितो. लिहून झाल्यावर मी सांगतो, अजून लिहिणे बाकी आहे. वाट पाहा, ‘माय नेक्स्ट वन!’ त्याला हेच कारण आहे.

एकदा नाटक लिहून झाल्यावर त्याच्या भवितव्यावर नाटककाराचा अधिकार नसतो. दिग्दर्शक, प्रेक्षकच ते ठरवतात. नाटक हे दिग्दर्शकाचे माध्यम आहे. सत्यदेव दुबे, विजया मेहता, अल्काझी अशा अनेक दिग्दर्शकांनी माझी नाटके केली. प्रत्येकाची काम करण्याची, नाटक साकार करण्याची, व्यक्त होण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी होती, असे कार्नाड म्हणाले.

दूरदर्शनाचा फायदा
1980 पर्यंत देशात दूरदर्शन नव्हते. त्यामुळे कलावंतांना रंगभूमी हेच माध्यम होते. रंगभूमीवर नवनवीन कलावंत यायचे. फिल्म इन्स्टिट्यूटमधून अभिनयाचे प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या नवोदितांना संधी मिळायची, पण त्यांना चित्रपटात संधी मिळत नसे. दूरदर्शन आल्यामुळे सर्व कलावंत तिकडे वळले. आता एखाद-दोन नाटकात काम केले की, प्रत्येक जण दूरदर्शन मालिकांकडे वळतो. हा दूरदर्शनचा एक फायदा झाला.

सिनेमा प्रयोगशील नाही
माझ्या नाटकातील प्रयोगशीलता समांतर सिनेमात दिसली नाही, वा समांतर चित्रपटाच्या चळवळीबाबत मी उदासीन राहिलो हे खरे आहे. आपण कुठपर्यंत काम करू शकतो, काय करू शकतो, हेही पाहिले पाहिजे. नव्या पिढीतही तांत्रिक सफाई, उच्च निर्मितिमूल्यांचा वापर करून पूर्णपणे व्यावसायिक चित्रपटातही चांगले विषय मांडले जात आहेत. ‘इंग्लिश-विंग्लिश’, ‘क्वीन’, ‘विकी डोनर’ या चित्रपटांच्या दिग्दर्शकांनी उत्तम विषय हाताळले.

पुरस्कारात मोठेपण नाही
कर्नाटकातील साहित्यीकांनी सर्वाधिक आठ ज्ञानपीठ पुरस्कार मिळवले. त्याबाबत मी काही सांगू शकत नाही. ज्ञानपीठ मिळाल्याचा मलाही खूप आनंद आहे, पण इतर पुरस्कारही तितकेच महत्त्वाचे आहेत. ज्ञानपीठ न मिळालेले कलावंत, कलाकार वा लेखक वा साहित्यिक मोठे नाहीत, असा त्याचा अर्थ होत नाही. भैरप्पा यांनी सरस्वती सन्मान पुरस्कार मिळवला. तोही तेवढाच महत्त्वाचा आहे. कुणाचेही मोठेपण केवळ पुरस्कारात तोलू नये.

महेश एलकुंचवारांचा गौरव
सुप्रसिद्ध नाटककार महेश एलकुंचवार यांच्या अनेक नाटकांचा अनुवाद कार्नाड यांनी कन्नडमध्ये केला. एलकुंचवारांच्या ‘वांसासी जीर्णानी’चा पहिला प्रयोग कन्नडमध्येच झाला. एलकुंचवारांनी शांततेलाही अर्थ दिला, असे गौरवोद्गार कार्नाड यांनी काढले. त्यांची नाटके पाहून आपण असे करायला हवे होते, असे म्हणायला हवे होते, असे वाटते. म्हणून त्यांच्या नाटकांचे अनुवाद केले, अशा शब्दांत कार्नाडांनी एलकुंचवारांचा गौरव केला. प्रारंभी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर व महेश एलकुंचवारांच्या हस्ते गिरीश कार्नाड यांचा सत्कार.

अनेकांना दिली संधी
ओम पुरी, नसिरुद्दीन शाह व अमरीश पुरी या तिघांनाही इंडस्ट्रीत मी संधी दिली. ‘गिरीश कार्नाड नसते तर मी इंडस्ट्रीत नसतो’ हे ओम पुरीचे वक्तव्य अगदी खरे आहे. अमरीश पुरीने त्याच्या आत्मचरित्रात माझा उल्लेख केला आहे, तर नसिरुद्दीन शाहच्या प्रतिभेची ओळख फिल्म इन्स्टिट्यूटच्या संपाच्या वेळी झाली. श्याम बेनेगल नव्या चेहर्‍याच्या शोधात होते. त्या वेळी मीच नसीरला त्यांच्याकडे पाठवले.