आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेकींसाठी ‘अच्छे दिन’; दत्तक घेताना प्राधान्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - वंशाचा दिवा म्हटला की तो हमखास पोरगाच. मुलीला तिथे स्थान नव्हते. याच जुन्या समजुतीतून स्त्री भ्रूणहत्येचे माणुसकीला काळिमा फासणारे प्रकार गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रासह देशभरात वाढले. मात्र, गेल्या काही दिवसांत या विषयावर झालेल्या जनजागृतीमुळे लोकांची मानसिकता बदलली. पणतीचा प्रकाश केवळ आपलेच नाही, तर दोन्ही घरे उजळून टाकतो हा विश्वास निर्माण झाला. याच भावनेतून आता मुलींच्या जन्माचा दर गेल्या काही दिवसांत राज्यात वाढत असल्याचे आशादायी चित्र निर्माण झाले आहे. मात्र, एवढ्यावरच न थांबता दत्तक घेतानाही एकेकाळी मुलाचाच आग्रह धरणार्‍या महाराष्ट्रात आता मुलींना स्वीकारण्यासाठी चढाओढ लागली आहे, पहिली पसंती दिली जात आहे.

राज्य दत्तक समन्वय संस्थेचे व्यवस्थापक अमोल शिंदे यांनी दिलेल्या माहितीतून हे आशादायी व आनंददायी चित्र समोर आले आहे. बालकाश्रमातून कायदेशीररीत्या बालके दत्तक दिली जातात. देशांतर्गत व विदेशात दत्तक देणार्‍या संस्था अशी वर्गवारी संस्थांची केली आहे. विदेशात दत्तक देणार्‍या महाराष्ट्रात २४, तर देशांतर्गत दत्तक देणार्‍या ६९ संस्था आहेत. महाराष्ट्रातील या सर्व संस्थांची माहिती राज्य दत्तक समन्वय संस्थेतर्फे ठेवण्यात येते.

कोकणात मुलीचा जन्मदर जास्त
राज्यात दरहजारी मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढत आहे. सध्या राज्यात हे प्रमाण १००० मुलांमागे मुली ९२९ असून त्यात ० ते ६ वर्षांच्या मुलींचे प्रमाण ८९४ आहे. रत्नागिरी (११२२) व सिंधुदुर्ग (१०३६) दोन जिल्हे पहिल्या क्रमाकांवर आहेत. त्याखालोखाल सातारा (९८८), नंदुरबार (९७८), भंडारा (९८२), गोंदिया (९९९), गडचिरोली (९८२), चंद्रपूर (९६१), यवतमाळ (९५२), अमरावती व नागपूर (९५१), रायगड (९५९), कोल्हापूर (९५७) व सांगली (९६६) यांचा क्रमांक लागताे.

लवकरच बदलणार नियम
सेंट्रल अ‍ॅडॉप्शन रिसोर्सेस अ‍ॅथॉरिटी (कारा) ही केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयांतर्गत काम करणारी संस्था दत्तक घेण्याच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवून असते. ही संस्था दत्तक घेण्याच्या नियमांत काळानुरूप बदलही करत असते. आता लवकरच पुन्हा बदल होणार असल्याची माहिती एका संस्थाचालकाने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

दत्तक घेण्याची प्रक्रिया
- अविवाहित व्यक्ती, मूल न झालेले दांपत्य तसेच मूल असलेले दांपत्यही दत्तक घेऊ शकतात.
- दत्तक घेणारे पालक व मूल यांच्यात किमान २० वर्षांचे अंतर असणे गरजेचे आहे.
- दत्तक घेण्यासाठी पती व पत्नी दोघांचीही संमती आवश्यक. तसेच दांपत्याची शैक्षणिक, कौटुंबिक व आर्थिक माहिती घेतली जाते.
- दत्तक घेऊ इच्छिणार्‍या दांपत्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येते. त्यांची शारीरिक व मानसिक स्थिती, पती-पत्नीचे संबंध तपासून घेतले जातात.
- दत्तक ग्रहण शिफारस समिती या सर्व गोष्टींची खात्री करते, त्यासाठी संबंधितांच्या घरी भेट देऊन सत्यता तपासली जाते. मगच निर्णय घेतला जातो.
- दत्तक दिल्यावरही वर्षभर संस्था आढावा घेते. नीट सांभाळ हाेत नसेल तर मूल परतही घेते.

मी एका मुलीचा पिता असल्याने सांगतो... मुली आपल्या घरी भाग्य घेऊन येतात. आई-वडिलांची काळजीही घेतात. दत्तक घेण्यात मुलींना पहिली पसंती आहे, ही खूपच आनंदाची गोष्ट आहे. दत्तक घेण्यासंबंधीचे कायदे कडक असल्याने ही मुले- मुली योग्य हातात पडतात. मुलींच्या बाबतीत समाजाची दिशा सकारात्मक आहे, ही आनंदाची बाब आहे. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री