आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहा हजार रुपये न भरल्याने उपचारास नकार, मुलीचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- दहा हजार रुपये अाधी जमा न केल्यामुळे येथील शुअरटेक हॉस्पिटलमधील डाॅक्टरांनी एका चारवर्षीय मुलीवर उपचार करण्यास नकार दिला. तसेच रात्री साडेतीन वाजता आजारी मुलीसह तिच्या आईवडिलांना रुग्णालयाबाहेर हाकलले. दरम्यान, उपचाराअभावी त्या मुलीचा दुर्दैवी अंत झाला असून डॉक्टरांच्या या निर्दयी मानसिकतेचा सर्वच स्तरांतून निषेध नोंदवण्यात येत आहे.

कोणिका कमलेश शेंडे, असे उपचाराअभावी मृत पावलेल्या दुर्दैवी मुलीचे नाव आहे. पाचपावली परिसरात राहणारे कमलेश आणि सारिका शेंडे हे दांपत्य कोणिकास घेऊन अापल्या सासूरवाडीला अमरावती जिल्ह्यातील चिंचखेड येथे गेले होते. सोमवारी ११ मे रोजी कोणिकाला ताप आला. त्यांनी अमरावती गाठून मुलीला एका खासगी रुग्णालयात दाखवले. अमरावतीच्या डॉक्टरांनी मुलीची प्रकृती तपासून नागपूरला हलवण्याचा सल्ला दिला. सोमवारी रात्री १२ वाजताच त्यांनी एका रुग्णवाहिकेतून मुलीला नागपूरला हलवण्याचा निर्णय घेतला. त्या रात्री ३ वाजता हे दांपत्य नागपुरातील शुअरटेक रुग्णालयात पोहाेचले. त्या वेळी दांपत्याने रुग्णवाहिका चालकास ४ हजार रुपये दिले व त्यांच्याजवळ साडेतीन हजार रुपये उरले होते.
तेवढ्या रात्री त्यांनी मुलीला रुग्णालयात दाखल करण्याची विनंती केली. त्या वेळी रुग्णालय प्रशासनाने त्यांना १० हजार रुपये जमा करण्यास सांगितले, परंतु शेंडे दांपत्याकडे त्या वेळी केवळ साडेतीन हजार उपलब्ध होते. त्यांनी साडेतीन हजार जमा करून उर्वरित रक्कम सकाळी जमा करण्याचे आश्वासन दिले, परंतु रुग्णालय प्रशासन ऐकायला तयार नव्हते.

मंगळसूत्र ठेवले तारण
मुलीचा जीव वाचवण्यासाठी शेंडे दांपत्याने रुग्णालय प्रशासनाला हातपाय जोडले. सारिका शेंडे यांनी स्वत:च्या गळ्यातील मंगळसूत्र देण्याची तयारी दर्शवली असता रुग्णालय प्रशासनाने मुलीला आयसीयूमध्ये दाखल केले. दरम्यान, रात्री ड्यूटीवर असणारे डॉ. योगेश पापडे यांना दूरध्वनीवरून नवीन रुग्णाची माहिती देण्यात आली; परंतु पैसे न भरल्यामुळे डॉ. पापडे यांनी
मुलीला तपासण्यास नकार देत त्यांना बाहेर काढण्याचे आदेश प्रशासनाला दिले.

या गोंधळात मुलीवर उपचार करण्याचे राहून गेले आणि रात्री साडेतीन वाजता रुग्णालय प्रशासनाने त्यांना बाहेर काढले. त्यानंतर हताश शेंडे दांपत्य मुलीला घेऊन महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात पोहोचले. त्या वेळी महापालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टरांनी मुलीला तपासून मृत घोषित केले, अशी माहिती मुलीच्या आई-वडिलांनी दिली.

युवक काँग्रेसची निदर्शने
शेंडे दांपत्याने हा प्रकार युवक काँग्रेसच्या नेत्यांना सांगितला असता त्यांनी मुलीच्या आईवडिलांसह बुधवारी दुपारी शुअरटेक रुग्णालयासमोर निदर्शने केली. त्यामुळे रुग्णालयात तणावाचे वातावरण होते.
आम्हाला कल्पना नाही
डॉ. योगेश पापडे यांचे क्लिनिक दुसरीकडे आहे. ते या रुग्णालयात फक्त सेवा देतात. या प्रकरणाची मला कल्पना नाही, अशी प्रतिक्रिया शुअरटेक रुग्णालयाचे संचालक डॉ. दीपक देशमुख यांनी दिली.