नागपूर - नाशिक जिल्ह्यातील येवला, निफाड, मालेगाव, देवळा तालुक्यांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झोडपले असून द्राक्ष बागायतदारांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते व माजी बांधकाम मंत्री छगन भुजबळ रविवारी गारपीटग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. दौरा करून आल्यानंतर सोमवारी गारपीटग्रस्तांना
भरीव मदत देण्याची मागणी विधानसभेत करणार असल्याचे भुजबळ यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.
शुक्रवारी भुजबळ यांनी विधानसभेत स्थगन प्रस्तावाद्वारे नाशिक येथील गारपिटीचा मुद्दा उपस्थित करीत झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून मदत जाहीर करण्याची मागणी केली. कोकणातील आमदारांनीही कोकणात अवकाळी पावसाने शेतक-यांचे नुकसान झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. मुख्यमंत्री सभागृहात उपस्थित नसल्याने उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी संध्याकाळपर्यंत निवेदन केले जाईल, असे आश्वासन दिले. मुख्यमंत्री सभागृहात आल्यानंतर भुजबळ यांनी पुन्हा गारपीटग्रस्तांचा मुद्दा उपस्थित करीत, द्राक्ष, डाळिंब, कांद्याचे पीक गेल्याचे सांगत मदतीची मागणी केली.
मुख्यमंत्र्यांनीही नाशिक, कोकणमधील अवकाळी पावसाची माहिती घेऊन निवेदन करू असे सांगितले. मात्र कामकाज संपेपर्यंत सरकारने निवेदन केले नाही त्यावरून सरकार किती गंभीर आहे ते दिसत असल्याचे भुजबळ म्हणाले.
मराठवाड्याप्रमाणे आर्थिक मदत करा
नाशकातील द्राक्ष बागायतदारांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच पावसामुळे गहू, नवीन लागवड केलेला कांदा, डाळिंब पिकांचेही नुकसान झाले आहे. सरकारने विदर्भ, मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांना भरीव मदत दिली आहे, तशीच मदत नाशिकमधील गारपीट आणि अवकाळी पाऊसग्रस्त शेतक-यांनाही दिली पाहिजे, अशी मागणी भुजबळ यांनी केली. रविवारी मी येवला आणि अन्य गारपीटग्रस्त तालुक्यांचा दौरा करणार असून तेथील नुकसानीची माहिती घेणार आहे. सोमवारी विधानसभेत पुन्हा एकदा हा मुद्दा उपस्थित करीत मी या शेतक-यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करीन, असेही भुजबळ यांनी सांगितले.