नागपूर - विदर्भाने अडचणीच्या काळातही काँग्रेसची साथ सोडली नाही. तशीच साथ आताही द्या, असे भावनिक आवाहन काँग्रेस अध्यक्षा
सोनिया गांधी यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे आयोजित सभेत बोलताना केले. ब्रह्मपुरी येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित त्यांच्या सभेला मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.
गांधी म्हणाल्या, काँग्रेसने नेहमीच विदर्भाच्या विकासाची भूमिका घेतली. विदर्भही कायम काँग्रेससोबत राहिला. भाजप-शिवसेना हे आतून एकच असून निवडणुकीनंतर दोन्ही पक्ष एकत्र येणार आहेत. तेव्हा त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. काल-परवापर्यंत आमच्यासोबत असणारे आज विरोधात लढत आहेत. निवडणुकीनंतर ते कोणासोबत जातात, हेही पाहावे लागेल. त्यांच्यावरही विश्वास ठेवावा असे नाही, असा चिमटा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव न घेता काढला.
पंतप्रधान
नरेंद्र मोदी रोज नवी घोषणा करत आहे. पण नुसत्या घोषणांवर देश चालत नाही. संपुआ सरकारच्या योजना ते नाव बदलून चालवत आहेत. त्यांच्याकडे स्वत:चे असे सांगण्यासारखे काहीच नाही, अशी टीका सोनियांनी केली. भाजप जनतेची फसवणूक करत आहे. भाजपचा मुखवटा आणि भूलथापांना भुलू नका, असे आवाहन सोनिया यांनी या वेळी मतदारांना केले.