आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जन्माष्टमीच्या आनंदाला उत्साहाचे उधाण; दहाव्या दहीहंडीसाठी करावी लागणार वर्षभराची प्रतीक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - गोकुळाष्टमीच्या दिवशी माणसांच्या गर्दीने न्हाऊन निघणारा राजकमल चौक सोमवारी अगदी नि:शब्दच राहिला. त्यामुळे दहाव्या दहीहंडीची आस लावून बसलेल्या नागरिकांना तब्बल वर्षभराची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

नवयुवक विद्यार्थी संघटनेतर्फे राजकमल चौकात भरवली जाणारी दहीहंडी स्पर्धा यावर्षीपुरती थांबवण्यात आली आहे. दहीहंडीच्या आयोजनाचे या संघटनेचे हे दहावे वर्ष होते; परंतु यावर्षी ती आयोजित न केल्याने अमरावतीकरांसह दूरवरून येणार्‍या नागरिकांना पुढच्या गोकुळाष्टमीची वाट पाहावी लागणार आहे.

त्यामुळे डीजे तालावर बेधुंद नाचणारी तरुणाई, दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झालेल्या गोपालांना मिळणारे ‘चिअरिंग,’ ‘मच गया शोर..’ पासून ‘गो-गो-गो गोविंदा’पर्यंतची शरद पटेल यांच्याकरवी केली जाणारी गाण्यांची निवड, महापालिकेच्या पाण्याचा न थांबणारा तुषार आणि चौकातील एकूणच रुटीन थांबवणारा जल्लोष हे सारेच यावर्षीपुरते थांबले आहे.

खटकणारे सुनेपण
राजकमल चौकातील दहीहंडी हा सामान्यांचा उत्सव असतो. तो थांबल्यामुळे अनेकांनी खंत व्यक्त केली. त्यामुळे उत्साहावर विरजण पडले. तसा हा खंड खुद्द आयोजकांनाही खटकला. चौकाला जिवंतपणा प्रदान करणारे बबन रडके, संजय देशमुख, बाबा राठोड, दिलीप मेहरे, अशोक काळे, डी. के. सिंग, श्रीधर वानखडे, विकास पाध्ये, गोटूभाई राठोड, देवानंद देशमुख, मामा मुंशी, महेश साहू, मुकेश शर्मा या सर्वांसह दहीहंडीच्या कार्यक्रमाचे संचालन करणारे रज्जू वर्मा यांनाही तो नकोच होता; परंतु यावर्षीचे हे सुनेपण सहन करणे अपरिहार्य झाले आहे.

इस्कॉन राठीनगर परिसरातील इस्कॉन मंदिरात सोमवारी (दि.18) श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव साजरा करण्यात आला. पहाटे साडेचार वाजता मंगल आरतीने जन्माष्टमीला सुरुवात झाली. सकाळी आठ वाजता श्रुंगार दर्शनाला शेकडो भाविकांनी माथा टेकला. सायंकाळी सहा ते दहा वाजताच्या सुमारास भजन संध्या, नृत्य, लघु नाटिका व कृष्णलीला आदी सांस्कृतिक कार्यक्रमांचे भरगच्च् आयोजन करण्यात आले होते. रात्री दहा वाजता महाअभिषेक, अकराच्या सुमारास महासंकीर्तन व नृत्य तथा बाराच्या सुमारास श्रीकृष्णजन्म आणि महाआरती करण्यात आली. याशिवाय 108 भोग विशेष दर्शन व झुला दर्शनाने भक्तांचे लक्ष वेधले.

माताखिडकी माताखिडकी (बुधवारा) येथील पुरातन श्रीकृष्ण मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव थाटामाटात साजरा करण्यात आला. रंगीबेरंगी हार व फुग्यांनी संपूर्ण मंदिर सजवण्यात आले होते, तर जन्माष्टमीनिमित्त विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
भाजीबाजार : भाजीबाजारातील मुरलीधर व ब्रह्मचारी महाराज संस्थानच्या श्रीकृष्ण मंदिरात जन्माष्टमीनिमित्त पहाटे श्रींची काकड आरती करण्यात आली. श्रींची पालखीतून नगर प्रदक्षिणा काढून जन्माष्टमी साजरी करण्यात आली. त्याचप्रमाणे सप्ताहापासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता करण्यात आली. मंगळवारी (दि.19) अनुपमा देशकर यांचे दुपारी तीन वाजता काल्याचे किर्तन होईल, तर रात्री सात ते दहाच्या सुमारास श्रींची रथयात्रा काढण्यात येईल व अंबादेवी संस्थान येथे दहीहंडीचा कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे. रथयात्रेत खोलापूर येथील ब्रह्मानंद स्वामी मठ वारकरी सांप्रदाय भजनी मंडळासह भाविक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती विश्वस्तांनी दिली.
नवीन बायपास
शोभेच्या वस्तू, रंगीबेरंगी फुगे व मनमोहक फुलांनी सजवण्यात आलेल्या नवीन बायपास रोडवरील श्रीकृष्ण महानुभाव मंदिरात भाविकांची सकाळपासूनच अलोट गर्दी होती.