आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माताखिडकी श्रीकृष्ण मंदिरात गर्दी
अमरावती - माताखिडकी (बुधवारा) येथील पुरातन श्रीकृष्ण मंदिरात रविवारी (दि. 17) श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रंगीबेरंगी हार-फुलांनी संपूर्ण मंदिर सजवण्यात आले होते. फुलांचा दरवळ संपूर्ण परिसरात पसरला होता. श्रीकृष्णाचा गजर, टाळ-मृदंगाचा निनाद, भक्तांचा उत्साह तथा श्रीकृष्ण भजन-आरतीने परिसरात चैतन्य संचारले होते.
दरम्यान, पहाटेपासूनच मंदिरात भाविकांची रिघ लागली होती. सकाळपासूनच भक्तांनी मंदिरात नतमस्तक होत दैनंदिन कामकाजाला सुरुवात केली. तथापि, सकाळी सात ते नऊच्या दरम्यान गीतापाठ कार्यक्रमाने जन्माष्टमी महोत्सवाला सुरुवात झाली. त्यानंतर दहा वाजता मंगलस्नान, सायंकाळी सात ते आठच्या सुमारास निशुदादा शेवळी यांचा श्रीकृष्ण जन्माध्याय, तर रात्री आठ ते बारा वाजताला देमेराज बिडकर यांच्या पंचकृष्ण भजन संध्येचा भाविकांनी मनमुराद आनंद लुटला. जन्मोत्सवानिमित्त पहाटेपासूनच भरगच्च धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होती. दिवसभर श्रीकृष्णाचा जयघोष सुरू असल्याने परिसरात मंगलमय वातावरण होते. रात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा नेत्रदीपक असाच होता. हा सोहळा बघण्यासाठी मंदिरात भाविकांची चिक्कार गर्दी होती. जन्मोत्सवानंतर प्रसाद वितरण करून महोत्सवाची सांगता करण्यात आली. तत्पूर्वी नितीन देशमुख, विनोद कराळे व राहुल सावरकर यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. महोत्सवाचे आयोजन श्रीकृष्ण मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष पावडे, डॉ. अशोक राऊत, अ‍ॅड. अरुण ठाकरे, सुशांत चर्जन, रावसाहेब राऊत, सुरेश देशमुख, सुरेंद्रमुनी कारंजेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी भूषण तसरे, भूषण वानखडे, रूपेश वेरुळकर, राजेश यादव, शेखर गावंडे, राकेश महल्ले, पंकज कराळे, पंकज घोरमाडे, वैभव ठाकरे व निखिल लुंगे यांनी सहकार्य केले.
भजन संध्येने आणली रंगत
देमेराज बिडकर यांनी गायलेल्या ‘चक्रधर प्रभुका नाम है, उद्धारण उनका काम है, ऐसे श्रीराऊळ को दंडवत प्रणाम,’ या भजनाला भाविकांनी भरभरून प्रतिसाद दिला. विविध भजनांनी मंदिरात चैतन्याचे वातावरण पसरले होते. मंदिरात येणार्‍या प्रत्येक भक्ताला फळांचा प्रसाद देण्यात आला.
कलाकृतीतून साकारले भिंतीवर गोकूळ
अमरावती । गोकुळात गायी चारायला गेलेला कान्हा मधुर मुरली वाजवून सवंगडी, गायी, झाडं, पक्षी असा सर्वांना कसा मंत्रमुग्ध करत असल्याचा हुबेहूब देखावा सिमेंट काँक्रीटच्या आधारे पाटबंधारे विभागाचे सहायक मुख्य अभियंता किरण हातगावकर यांच्या घरातील भिंतीवर साकारण्यात आला आहे.
हे दृश्य तयार करण्यासाठी मूर्तिकार सुदाम पाडवार यांना पावणेतीन महिने लागले. कदंबाच्या झाडाला टेकून बासरीवादनात मग्न असलेला गोंडस श्रीहरी बघून कोणाचेही मन आनंदात न्हाऊन निघेल, असे हे दृश्य आहे. ज्या कदंबाच्या झाडाखाली श्रीकृष्णाला उभे दर्शवण्यात आले, त्याला 7,500 पाने लावण्यात आली आहेत. म्हणून हातगावकर आणि मूर्तिकार पाडवार नाशिकला जाऊन ते बघून आले. त्यानंतर हा भरगच्च वृक्ष साकारण्यात आला. आठ वर्षांपूर्वी या कलाकृतीच्या निर्मितीसाठी 13,500 रुपये खर्च आल्याचे हातगावकर यांनी सांगितले. या भिंतीवरील दृश्यात असे काही रंग भरण्यात आले, की त्यातील प्रत्येक वस्तू ही सजीव वाटते. हा देखावा बघण्यासाठी शहरातून बरेच लोक येऊन गेले आहेत.
भजन संध्या, संगीतात रंगला जन्मोत्सव
अमरावती । जगजित सिंह व चित्रा सिंह यांच्या रचलेल्या व गायलेल्या ‘समर्पण श्रीकृष्ण भजन’ कार्यक्रमात गायक आल्हाद काशिकर व स्वाती काशिकर यांच्या सुमधुर गायनाने जन्माष्टमी महोत्सवाच्या भजन संध्या संगीतमय कार्यक्रमात जान फुंकली. गायकांच्या बहारदार आवाजात वाद्यांचा मेळ जुळवत भक्तांनी भजनांचा मनमुराद आनंद लुटला. सुमारे तासभर चाललेल्या या संगीतमय भजनसंध्येत भक्तगण तल्लीन होऊन भजनांचा आस्वाद घेतला.
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त राठीनगर परिसरातील इस्कॉन मंदिरात रविवारी (दि. 17) भक्तांसाठी आयोजित खास भजनसंध्या कार्यक्रमात कलावंतांनी भक्तांचा तब्बल तासभर रिझवले. कलाकरांच्या मधुर आवाजाने भाविकांना तासभर श्रीकृष्ण भजनांचा लीन होण्याचा आनंद लाभला. श्री श्री रुक्मिणी द्वारकाधीश मंदिर संस्थानतर्फे सात आॅगस्ट ते 19 आॅगस्टपर्यंत विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, तर 11 आॅगस्टपासून सुरू झालेल्या श्रीमद भागवतकथेचा रविवारी सायंकाळी समारोप करण्यात आला. भजनसंध्येने भक्तांमध्ये उत्साह, जल्लोष आणि आनंदाचे वातावरण होते.
इस्कॉन मंदिरात जन्माष्टमी
राठीनगर परिसरातील इस्कॉन मंदिरात सोमवारी (दि.18) श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव साजरा होणार आहे. पहाटे साडेचार वाजता मंगल आरतीने जन्माष्टमीला सुरुवात होईल. सकाळी आठ वाजता श्रुंगार दर्शन होईल. सायंकाळी सहा ते दहा वाजताच्या सुमारास भजन संध्या, नृत्य, लघु नाटिका व कृष्णलीला आदी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री दहा वाजता महाअभिषेक, अकराच्या सुमारास महासंकीर्तन व नृत्य तथा बाराच्या सुमारास श्रीकृष्णजन्म आणि त्यानंतर महाआरती होणार आहे.