गोंदिया- गोरेगाव तालुक्यातील कवलेवाडा येथील संजय खोब्रागडे यांना धार्मिकस्थळाच्या वादातून जाळण्यात आले होते. 90 टक्के भाजलेल्या खोब्रागडे यांच्यावर नागपूर येथील मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. हे वृत्त समजताच शुक्रवारी गोंदियात स्वयंस्फूर्तीने बंद पाळण्यात आला.
शुक्रवारी सकाळपासूनच शहरात बंदचे वातावरण होते. काही युवक निषेधाच्या घोषणा देत होते तर काहींनी आंबेडकर चौकातून फेरी निषेध काढली. त्यानंतर उपविभागीय महसूल अधिकारी दिलीप सावरकर यांना निवेदन देण्यात आले. संजय खोब्रागडेचा मृतदेह आणण्यासाठी त्याच्या पत्नीची तुरुंगातून सुटका करा, त्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करावे, आदी मागण्या करण्यात आल्या. त्यानंतर निषेध सभा घेण्यात येऊन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला.
कार्यकर्त्याला मारहाण
कार्यकर्ते बंदचे आवाहन करत फिरत असताना भाजी मार्केटमध्ये आले. तेथे ठाकूर नामक व्यक्तीने उत्तम मेर्शाम या कार्यकर्त्याला फणस कापण्याच्या कोयत्याने मारले. त्यातून परिस्थिती चिघळण्याची चिन्हे होती. परंतु, ठाणेदार अविनाश काळदाते यांच्या मध्यस्थीने वाद टळला.
या प्रकरणात पोलिसांनी मृत संजय खोब्रागडे यांनी दिलेले मृत्यूपूर्व बयाण खरे न मानता त्यांची पत्नी देवकाबाईने दिलेल्या बयाणावर विश्वास ठेवून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न चालवला आहे. तिचा कथित प्रियकर राजू गडपायले व देवकाबाईने मिळून संजयला जाळले, असे आरोपपत्र तयार करून न्यायालयात सादर केले. त्यामुळे एसपी दिलीप झळके व ठाणेदार पाटील यांना निलंबित करावे,अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.