नागपूर - शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे चिंतेचा विषय बनला असून, तो कमी कसा करता येईल, यावर तज्ज्ञांचे चिंतन सुरू आहे. दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारही प्रयत्नरत असताना गोंदिया जिल्हा परिषदेद्वारा संचालित एक उच्च प्राथमिक शाळा ‘दप्तरमुक्त’ झाली आहे.
गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव हा आदिवासी तालुका अाहे. तालुका हा नक्षल प्रभावित आहे. येथे शहीद जाम्या-तिम्या जिल्हा परिषद माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय आहे. या शाळेत वर्ग ५ ते १२ वी पर्यंत वर्ग अाहेत. तालुक्याच्या १५ कि.मी. परिसरातील वेगवेगळ्या गावांतील १ हजार १०० वर विद्यार्थी शाळेत शिक्षण घेतात. काही विद्यार्थ्यांचा अपवाद वगळता बहुतांश मुले ग्रामीण भागातून ५ ते १५ कि.मी.चे अंतर पायी कापून शाळेत पोहोचतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऊन, पावसाच्या दिवसांमध्ये दप्तराचे ओझे पाठीवर घेऊन शाळा गाठणे कठीण असते. एक दिवस मुसळधार पाऊस सुरू असताना दोन विद्यार्थी सायकलवरून शाळेत येत होते. त्या वेळी शाळेतील शिक्षक मोहंमद रियाज शेख यांनी त्यांना बघितले. त्या दिवशी शेख यांनी मुलांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांनी ‘दप्तरमुक्त अभियान’ एक संकल्पना मुख्याध्यापक आकरे यांच्यासमोर मांडली. मुख्याध्यापकांनीही शेख यांच्या संकल्पनेचे कौतुक केले. या संकल्पनेतून ५ ते ८ पर्यंतचे वर्ग दप्तरमुक्त झाले.
गोरेगाव येथील जिल्हा परिषद शाळेने राबवलेला दप्तरमुक्त अभियानाचा आदर्श तालुक्यातील इतर शाळांनीही घेतला असून, त्या ही अभियान राबवणार असल्याची माहिती आकरे यांनी दिली.
असे आहे अभियान
‘सर्व शिक्षा अभियान’मार्फत पाचवी ते आठवीपर्यंतच्या गरजू विद्यार्थ्यांना शाळेतून पुस्तके वितरित करण्यात आली. तर, जुन्या विद्यार्थ्यांकडून शाळेला परत मिळालेल्या पुस्तकांचा पुनर्वापर करून त्याचे अनेक संच तयार करण्यात आले. प्रत्येक वर्गाला एक कपाट िदलेे. या कपाटाला कुलूप असून, किल्ल्या वर्गनायक आणि वर्ग शिक्षकांकडे देण्यात आल्या. एका वर्गात प्रत्येक बाकावर तीन विद्यार्थी बसवतात. प्रत्येक बाकासाठी पुस्तकांचा एक संच देण्यात आला. शिक्षकांनी दिलेल्या गृहपाठाकरिता केवळ एक ते दोन नोटबुकांची विद्यार्थ्यांना ने-आण करावी लागते, अशी माहिती मोहंमद रियाज शेख यांनी दिली.
दहावीपर्यंत उपक्रम राबवण्याचा विचार
२०१४-१५ या शैक्षणिक सत्रात उच्च प्राथमिक वर्गांकरिता राबवलेले दप्तरमुक्त अभियान यशस्वी झाल्याने हा उपक्रम येत्या सत्रापासून नववी आणि दहावीकरिताही राबवण्यात येईल. सर्व शिक्षा अभियानातून नववी आणि दहावीकरिता पुस्तके मिळत नसल्याने इतर अनुदानातून पुस्तके विकत घेण्यात आली आहे.''- संजय आकरे, मुख्याध्यापक.