आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवकाळी, गारपीटग्रस्तांना सरकारचा दिलासा, मृतांच्या कुटुंबीयांना अडीच लाखांची मदत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - राज्यात फेब्रुवारी व मार्च २०१५ या दोन महिन्यांत अवकाळी पाऊस व गारपिटीत मरण पावलेल्या कुटुंबातील कर्त्या व्यक्तींच्या वारसांना विशेष बाब म्हणून अडीच लाख रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याआधी दीड लाख रुपयांची मदत देण्यात येत होती आता त्यात एक लाख रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

गेल्या दोन महिन्यांत राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतजमीन व पिकांची नासाडी आणि जीवित हानी झाली. या नैसर्गिक आपत्तीत मृत्युमुखी पडलेल्या आणि नुकसान झालेल्यांना विशेष दराने मदत देण्याचा निर्णय ९ एप्रिलच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. त्या अनुषंगाने सोमवार, १३ रोजी शासन निर्णय जारी करण्यात आला.

या निर्णयानुसार मृत व्यक्ती कुटुंबातील कर्ता असल्यास मुख्यमंत्री निधीतून एक लाख रुपयांची भर घालून अडीच लाखांची मदत देण्यात येणार आहे. याशिवाय गाय, बैल, म्हैस अशी मोठी जनावरे मृत्युमुखी पडल्यास जास्तीत जास्त एका जनावरापर्यंत २५ हजार, गाढव, खेचर आदी मध्यम जनावरांसाठी दोन जनावरांपर्यंत १० हजार, वासरू, वगारू आदी लहान जनावरांसाठी दोन जनावरांपर्यंत ५ हजार मदत देण्यात येईल. पूर्ण उद‌्ध्वस्त झालेल्या घरासाठी ७० हजार तर पूर्ण उद‌्ध्वस्त झालेऱ्या कच्च्या घरासाठी २५ हजार मदत आहे.

पिके, फळबागा व शेतजमिनीच्या नुकसानीसाठी २ हेक्टरपर्यंतच मदत देण्यात येईल. कोरडवाहू शेतीपिकासाठी प्रतिएकर दहा हजार, आश्वासित सिंचनाखालील पिकासाठी प्रतिएकर १५ हजार व फळबागांसाठी प्रतिएकर २५ हजार मदत देण्यात येईल. खरडून गेलेल्या जमिनीसाठी २० हजार रुपये प्रति एकर व वाहून गेलेल्या जमिनीसाठी २५ हजार रुपये प्रतिएकर मदत देय आहे. कोरडवाहू व ओलिताखालील शेतीसाठी मदतीची किमान मर्यादा ७५० रुपये व बहुवार्षिक पिकांसाठी १५०० रुपये इतकी राहील. गेल्या चार दिवसापासून झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीचे पंचनामे सुरू असून त्यांनाही या दराने मदत दिली जाणार अाहे.
लवकरच नवे कृषी धोरण, ज्येष्ठ शेतकऱ्यांना ५ हजार रुपये पेन्शन
दिव्य मराठी नेटवर्क | पाटणा
केंद्र सरकार आता ६० वर्षांवरील शेतक-यांना पाच हजार रुपये पेन्शन देण्याची तरतूद करण्याची तयारी करत आहे. गृहमंत्री राजनाथसिंह यांनी याबाबत माहिती दिली.

पाटण्यात कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. राजनाथ म्हणाले, शेती करणे आता तोट्याचा व्यवसाय राहणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह व्यापक योजना आखत आहेत. लवकरच नवीन कृषी धोरण जाहीर होईल. काम करण्याचे वय उलटूनही कठोर परिश्रम करणाऱ्या शेतकऱ्यांना मोबदला म्हणून एक निश्चित रक्कम मिळायलाच हवी. यासाठी शेतकऱ्यांना पेन्शन देण्याचा प्रस्ताव समोर आला आहे.