आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Government Give Support To Hailstorm Hit Farmers, Opposition Walk Out

गारपीटग्रस्तांना सरकारचा आधार, विरोधकांचा मात्र सभात्याग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - आधीच मोठा दुष्काळ, त्यात आता अवकाळी पाऊस व प्रचंड गारपिटीमुळे राज्यातील शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीची दखल घेऊन राज्य सरकारने बळीराजाला मदतीचा हात देताना िजरायतीसाठी हेक्टरी १० हजार, बागायतीकिरता १५ हजार, तर फळपिकांसाठी २५ हजारांची मदत करण्याची घोषणा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मंगळवारी विधान परिषदेत केली. दरम्यान, ही मदत तुटपुंजी असल्याचे सांगत विरोधकांनी मात्र सभात्याग केला.

गारपीट व अवकाळी पावसावरील चर्चेत लोकप्रतिनिधींनी निसर्गाच्या कोपामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतक-यांची व्यथा मांडल्यानंतर त्यावरील उत्तरात खडसे यांनी मदतीचा हात देताना दुष्काळाप्रमाणेच अवकाळी निसर्गाच्या कोपावर आता तात्पुरत्या उपाययोजनेबराेबरच कायमस्वरूपी योजनाही राबवण्यावर भर दिला. यासाठी गावस्तरावर हवामान केंद्र, फळपीक विमा योजना, परदेशातील धर्तीवर शेडनेट अशा योजना राबवण्याचा मनोदय खडसेंनी जाहीर केला. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेले नुकसान याचा अंदाज घेऊन ही मदत जाहीर करण्यात आली आहे. नोव्हेंबरमधील अवकाळी पाऊस तसेच डिसेंबरमधील अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे ३२ तालुके व ८९३ गावे बाधित झाली असून त्यामुळे सुमारे १ लाख हेक्टरचे नुकसान झाले आहे. कांदा, रब्बी ज्वारी, मका, गहू, तांदूळ, हरभरा, भाजीपाल्याबरोबरच द्राक्षे, डाळिंबे, आंबा, केळी, काजू हातचा गेल्याने शेतकरी पिचला गेल्याची माहिती खडसेंनी दिली.

विरोधकांचा सभात्याग
उत्तर महाराष्ट्रात झालेल्या गारपिटीत नुकसानग्रस्त शेतक-यांकरिता जाहीर करण्यात आलेल्या रकमेत वाढीच्या मागणीसाठी विरोधकांनी विधानसभेत सभात्याग केला. जाहीर करण्यात आलेली मदत अत्यंत तुटपुंजी आहे, असा आरोप विरोधकांनी केला. शेतक-यांना संपूर्ण कर्जमाफी द्या अशी आग्रही मागणी यावेळी विरोधकांनी केली.
*अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाइकांना अडीच लाख रुपये देणार
*शेतक-यांची जनावरे मृत झाल्यास : मोठे जनावर- २५ हजार, मध्यम- १० हजार, लहान-५ हजार, छोटे- ३५००.
*पडझड झालेल्या घरांसाठी मदत : पक्के घर- ७० हजार, कच्चे घर- २५ हजार, अंशत: नुकसान झालेले घर- १५ हजार.
*खरडून गेलेली जमीन मदत : २० हजार हेक्टरी. वाहून गेलेली जमीन मदत : २५ हजार हेक्टरी
नोव्हेंबरमध्ये नुकसान झालेले १० जिल्हे
नाशिक- १७ हजार हेक्टर, पुणे ६ हजार हेक्टर, उस्मानाबाद १५०० हेक्टर, सांगली ८०० हेक्टर, अहमदनगर ३०० हेक्टर. इतर- धुळे, सातारा व अमरावती.

डिसेंबरमध्ये नुकसान झालेले १० जिल्हे
नाशिक- ४२०० हेक्टर, जळगाव- ७८०० हेक्टर, सोलापूर ४७०० हेक्टर, रायगड ४५०० हेक्टर, धुळे ४२०० हेक्टर, सांगली १६०० हेक्टर, अहमदनगर १५०० हेक्टर. इतर- नंदुरबार, पुणे, सातारा.
मदतीचा दर (प्रचलित व आता घोषित)
-जिरायती : १० हजार प्रतिहेक्टर (प्रचलित ४५०० व आता ५५००)
-बागायती : १५ हजार प्रतिहेक्टर (प्रचलित ९ हजार व आता ६ हजार)
-फळपिके : २५ हजार प्रतिहेक्टर (प्रचलित १२ हजार व आता १३ हजार)
-धान पिके (तांदूळ) : ७५०० प्रतिहेक्टर
-इतर पिके : ५ हजार प्रतिहेक्टर
नुकसान झालेली मुख्य बागायती पिके : कांदा- १३, ६०० हेक्टर, रब्बी ज्वारी- ८५०० हेक्टर, मका- ३८०० हेक्टर, गहू- १५०० हेक्टर, हरभरा-१७०० हेक्टर, भाजीपाला - २५०० हेक्टर.
फळपिके : द्राक्षे-१० हजार ५०० हेक्टर, आंबा- ३५०० हेक्टर, केळी- ७०० हेक्टर, काजू - ९०० हेक्टर.

अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेले नुकसान
अवकाळी पाऊस : १४ ते १७ नोव्हेंबर, अंदाजित- ४० हजार हेक्टर
गारपीट व अवकाळी पाऊस : १२ ते १४ डिसेंबर, अंदाजित- ६० हजार हेक्टर
३२ तालुके व ८९३ गावे बाधित . एकूण नुकसान सुमारे ६ लाख हेक्टर.
कायमस्वरूपी उपाययोजना : हवामानावर आधारित पिक विमा योजना. सध्याच्या मंडळ स्तरावरील हवामान केंद्राऐवजी फळबागा क्षेत्रात गाव किंवा पंचायत क्षेत्रावर हवामान केंद्र. पिक विमा कंपन्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय. विमा हप्तावर केंद्र व राज्याकडून ५० % अनुदान.
शेडनेटचा उपाय : द्राक्षबागांवर प्लास्टिक किंवा विदेशातील शेडनेटच्या धर्तीवर कव्हर. मात्र त्याची किंमत ६ लाख प्रतिएकर असल्याने ती परवडणारी नाही. भविष्यात त्यासाठी अनुदान देता येईल. अधिकच्या दराने अनुदान किंवा मदत देण्यापेक्षा उत्तम फळपीक विमा योजना व द्राक्षबागांवर आच्छादन चांगल्या योजना ठरतील.

केंद्राकडूनही प्रस्ताव
राष्ट्रीय फलोत्पादन विभागाकडून द्राक्ष, डाळिंब व आंबा या फळपिकांसाठी मदत देण्यासाठी आपण केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन यांच्याशी चर्चा केली आहे. राज्याकडून १५ तर केंद्राकडून ८५ टक्के मदत घेऊन हेक्टरी ७० ते ८० हजार मदत देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. शेतक-यांना प्रत्येकी २ हेक्टरपर्यंत अशी मदत देण्यासाठी राज्य सरकार जोरदार प्रयत्न करणार आहे, असे खडसे म्हणाले.

सिनेमा बघितला तर काय चुकले : खडसे
अवकाळी पाऊस व गारपीट होत असताना महसूलमंत्री सिनेमा पाहण्यात गुंग होते, अशा बातम्या चालवून वृत्तवाहिन्यांनी माझी व सरकारची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. मात्र मी स्वत: सकाळपासून खान्देशात नुकसान भरपाईची माहिती घेण्यासाठी फिरलो, तसेच अधिका-यांसाेबत बैठका घेतल्या, ते मात्र दाखवले नाही. गेली ४० वर्षे जनतेसाठी प्रामाणिक काम करणारा मी लोकप्रतिनिधी असून गेल्या अनेक वर्षांत मी सिनेमा पाहिलेला नाही. पण, ऐरणी भाषेतील हुंड्यावरील सामाजिक सिनेमा बघयला गेलो तर केवढा गहजब करण्यात आला. मी माणूस नाही का, असा सवाल खडसे यांनी उपस्थित केला.