आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'जीआर’विरोधात उपोषणास्त्र; जुन्या कामगारांना कायम ठेवा, आदेश मागे घ्या;

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जुन्या कामगारांना कायम ठेवावे व बचत गटांकडे शालेय पोषण आहार योजना हस्तांतरित करणारा ‘जीआर’ मागे घ्यावा, या मागणीसाठी शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेच्या महिला कर्मचार्‍यांनी मंगळवारी (दि. 24) जिल्हा परिषदेसमोर उपोषणास्त्र उपसले.
जिल्हाभरातून सुमारे चारशे महिलांनी निदर्शने करून मागण्या मांडल्या. मागण्यांचे निवेदन शालेय शिक्षणमंत्र्यांनाही पाठवण्यात आल्याचे आंदोलकांनी सांगितले. शासनाने 26 फेबु्रवारी 2014 रोजी शालेय पोषण आहार योजना बचत गटांकडे हस्तांतरित करणारा ‘जीआर’ काढला. त्यामुळे राज्यातील सुमारे एक लाख 80 हजार शालेय पोषण कर्मचारी व जिल्ह्यातील पाच हजार कामगार रोजगारापासून वंचित राहणार आहेत. या विरोधात संघटनेने मार्च महिन्यापासून निवेदने, धरणे, निदर्शनांच्या माध्यमातून तो ‘जीआर’ मागे घेण्याची मागणी केल्याचे निवेदनात म्हटले आहे.

या संदर्भात पाच जूनला शिक्षणमंत्र्यांना निवेदनही देण्यात आले होते. 26 जूनपासून जिल्ह्यातील शाळा सुरू होणार असूनही शासनाने मागण्या मंजूर केलेल्या नाहीत. त्याच्या निषेधार्थ शालेय पोषण आहार राज्य समन्वय समितीने राज्यात 24 जूनपासून उपोषणाचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत मंगळवारपासून उपोषणाला सुरुवात करण्यात आल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष पांडे यांनी दिली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकार्‍यांनी त्यांची भेट घेतली. त्यांनी मुख्यमंत्र्यांना याबाबत माहिती दिल्याचे सीटू संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष पांडे यांनी सांगितले.
अकरा महिला बसल्या बेमुदत उपोषणाला
जुन्या कर्मचार्‍यांना कायम ठेवण्यात यावे, या मागणीसाठी शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेच्या महिला कर्मचारी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषणाला बसल्या आहेत. संगीता लांडगे, पंचफुला लोणारे, आशा मोरे, लता सुरजुसे, शीला इंगोले, वर्षा सहारे, नलिनी खाकसे, कमला गाडगे, पुष्पा कवरती, विद्या पांडे व अनिता पटले या अकरा महिलांचा त्यामध्ये समावेश आहे.