(फोटो : नागपूर येथील रुग्णालयात पीडित बाळावर उपचार सुरू आहेत.)
अमरावती/ नागपूर - पोटदुखीचा त्रास असणार्या अठरा दिवसांच्या नातवाला गरम विळ्याचे चटके देऊन अघोरी उपाय करणार्या ५० वर्षीय आजोबा विरोधात अमरावती पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, गंभीर अवस्थेतील या बालकाला नागपूरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आता प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी दिली.
चिखलदरा तालुक्यातील माडीझडप येथील १६ वर्षीय कुमारी मातेने १८ मार्च रोजी एका बाळाचा जन्म दिला. मात्र, कुमारवयात आई झाल्याने बदनामीच्या भीतीपोटी तिची बाहेरगावच्या नातेवाइकांकडे प्रसूती करण्यात आली. बाळ विकसित होण्याला दोन आठवडे कमी असतानाच ही प्रसूती झाली. त्यामुळे कमी वजनाचे बाळ जन्मले, त्याचे पोटही फुगले. या बाळाचे आजोबा वैद्य आहेत. सदर महिलेने बाळाच्या आजारपणाबाबत आजोबाला माहिती दिली. त्याने निखार्यावर विळा गरम करून बाळाला चटके दिले. या अघोरी उपचाराने बाळाची प्रकृती आणखी खालावली. अमरावतीत प्राथमिक उपचार केल्यानंतर या बाळाला नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले आहे.
अंनिसचे कार्यकर्ते रुग्णालयात
एका मांत्रिकाने उपचाराच्या नावाखाली बाळाला तप्त विळ्याचे चटके दिल्याची सुरुवातीला चर्चा होती. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नागपुरातील प्रमुख उमेश चौबे आणि कार्यकर्ते रुग्णालयात धडकले. त्यांनी रुग्णालय प्रशासनाची भेट घेऊन बाळाबाबत विचारणा केली. तसेच आरोपीवर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडे पाठपुरावा करणार असल्याचे चौबे यांनी सांगितले.