आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दरवाढीने छळवणूक, जगणं महाग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- महागाईचा तडाखा आता रक्तालाही बसणार आहे. एखाद्याचे प्राण वाचवण्यासाठी ‘अमृतबिंदू’ असलेला रक्ताचा थेंब अन् थेंब महत्त्वाचा आहे. राज्य शासनाने एक परिपत्रक काढत रक्ताचे दर निश्चित केले असून, नवीन दरनिश्चितीमुळे ब्लडबॅँकांतून मिळणार्‍या रक्ताच्या पिशव्यांच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. अमरावतीकरांसाठी दिलासादायक बाब अशी, की शहरातील रक्तपेढी संचालकांनी नवीन दरनिश्चिती तूर्तास लागू करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
नागपूर येथील एका रक्तपेढीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रक्ताचे दर निश्चित करण्यासंदर्भात याचिका दाखल केली होती. त्याच अनुषंगाने राष्ट्रीय रक्तसंक्रमण परिषदेने रक्त व रक्ताच्या घटकांच्या दरनिश्चितीसाठी 16 सदस्यीय समितीची स्थापना करून सुधारित दर निश्चित केले. रक्त आणि रक्तांच्या घटकांचे सेवा शुल्क निश्चित करण्यात आले असून, त्या दराबाबत राज्य शासनाने परिपत्रक काढले आहे. सुधारित दरापेक्षा जास्त दर रक्तासाठी घेण्यात येऊ नये, असेही परिपत्रकात नमूद केले आहे; तसेच थॅलेसेमिया, हिमोफेलिया, सिकलसेल व रक्ताशी निगडित इतर आजार (ज्या आजारात रुग्णास जीवित राहण्यासाठी रक्ताची वारंवार गरज आहे.) अशा आजारांच्या रुग्णांना मोफत रक्तपुरवठा करावा, असेही यात म्हटले आहे.
दरदिवशी रक्ताची गरज
इर्विनमधून 20 बॅग, संत गाडगेबाबा रक्तपेढीतून 28 बॅग, दारा रक्तपेढीतून 12 बॅग आणि सर्वाधिक 40 बॅग पीडीएमसीतील रक्तपेढीतून रुग्णांसाठी दरदिवशी घेतले जाते. दर वाढले तरी सध्या दरवाढ झालेली नसल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख रक्तपेढीच्या सूत्रांनी सांगितले. ते सध्या 500 ते 600 रुपये सेवाशुल्क घेतात. ‘संत गाडगेबाबा’चे संचालक गोडबोले यांनी सांगितले, की आम्ही सेवाशुल्क 600 रुपये घेत असून, त्यात वाढ करणार नसल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. चंद्रशेखर दारा यांनी सांगितले, की आम्ही प्रतिबॅग 900 रुपये सेवाशुल्क घेतो, यापेक्षा दर वाढवण्याची सध्या तरी तयारी नाही. अरे देवा! रक्ताचे दरसुद्धा वाढले
महागाईचा भस्मासुर
प्रत्येक क्षेत्रातील दरवाढीचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम सर्वसामान्यांच्या दैनंदिन जगण्यावर होत आहे. जीवनावश्यक वस्तूच महाग होत असल्याने त्या दरवाढीतून काही केल्या सुटका अशक्य होऊन बसली आहे. औषधं महागली, बस व रेल्वेचे तिकीटदर वाढले, शिक्षण महागले, इतकेच काय तर जीवनदान देणारे रक्तही महागल्याने सर्वसामान्यांची जगण्याने छळवणूक चालवली आहे. कष्टकर्‍यांचं, सर्वसामान्यांचं जगणं महाग होऊन बसलं आहे. ‘अच्छे दिन’ अद्यापही दूरच आहेत. नागरिकांच्या मागे लागलेले महागाईचे हे शुक्लकाष्ठ काही केल्या सुटायचे नाव घेत नाहीय..

ग्राहकाला जर एखाद्या वस्तूची किंमत सांगितली तर ते विचारात पडतात. प्रत्येक वस्तूमागे एक ते दीड रुपयांची दरवाढ झाली आहे. इयत्ता तिसरी आणि चौथीचे नवीन पुस्तकेही यंदा महागली आहेत. सौरभ देशमुख, विक्रेते.
वह्या, पुस्तके झाली महाग
पूर्वी प्राथमिक शिक्षण घेत असताना दोन नोटबूक्समध्ये वर्षभर भागायचे. आता वर्षाकाठी सुमारे पंधरा नोटबूक्स लागतात. शैक्षणिक साहित्यातील दरवाढीमुळे खिशाला कात्री लागणार आहे. अन्य खर्च तर बाकीच आहे. गजानन देशमुख, पालक.
शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी फुलला बाजार

धान्य, सिमेंट, खत, बियाण्यांना फटका
वाहतूक खर्च आणि कागदाच्या दरात वृद्धी झाल्याने यावर्षी वह्या, पुस्तके महागली आहेत. सर्वच साहित्यात नगामागे एक ते दीड रुपयांची दरवाढ झाल्याचे शहरातील शैक्षणिक साहित्य विक्रेत्यांनी सांगितले. अगोदरच भाज्या, औषध, प्रवासभाडे महागले असून, त्यात शैक्षणिक साहित्य दरवाढीची भर पडल्याने पालकांचे हात पोळणार आहे. शाळा उघडायला अवघे काही दिवस राहिल्याने शालेय साहित्याच्या दुकानांमध्ये विद्यार्थी आणि पालकांची गर्दी दिसून येत आहे. मुंबई, नागपूर येथून शहरात शैक्षणिक साहित्य आणले जाते असे विक्रेत्यांनी सांगितले. पूर्वी दोनशे पेजेसच्या नोटबूकमध्ये दोनशेच पाने असत, ती दरवर्षी कमी होताहेत. सध्या दोनशे पेजेसचे नोटबूक फक्त नावालाच आहे प्रत्यक्षात 148 ते 150 पाने या नोटबूकमध्ये आहेत. कागद महागल्याने दरवाढ झाल्याचे दुकानदारांनी सांगितले.