आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विषबाधाप्रकरणी प्रभारी मुख्याध्यापक निलंबित; ठेकेदाराची होणार चौकशी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेगाव - शेगाव येथील अनुसूचित जाती मुलींच्या शासकीय निवासी शाळेतील 73 विद्यार्थिनींना रविवारी झालेल्या विषबाधाप्रकरणी प्रभारी मुख्याध्यापक ए. बी. चव्हाण यांना निलंबित करण्यात आले आहे. जेवणाचे कंत्राट घेतलेल्या यशोदीप बहुउद्देशीय महिला संस्थेच्या प्रतिभा खिल्लारे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांची अन्न, औषध प्रशासन व समाजकल्याण विभागाकडून कसून चौकशी करण्यात येत आहे.


विषबाधा झालेल्या 73 पैकी 67 विद्यार्थिनींच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तर अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल केलेल्या प्रणिता पुंडकर हिची प्रकृती धोक्याबाहेर असून, अन्य सहा विद्यार्थिनींना पोटदुखीचा त्रास असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.


खामगाव येथील प्रतिभा खिल्लारे यांच्या यशोदीप बहुउद्देशीय महिला संस्थेस देण्यात आलेले स्वयंपाकाचे कंत्राट रद्द करण्यात आले असून, प्रतिभा खिल्लारेंसह त्यांच्या संस्थेविरोधात शेगाव पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. पोलिसांनी अन्न, सुरक्षा व अन्न भेसळ नियंत्रण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.


निकृष्ट, अन्नपदार्थ
बुलडाणा येथील समाजकल्याण उपायुक्त सुहास नागापूरकर यांनी तक्रारीत म्हटले आहे की, कंत्राटदार संस्थेने निकृष्ट, आरोग्यास अपायकारक तसेच अस्वच्छ रीतीने अन्नपदार्थ तयार करून ते विद्यार्थिनींना वितरित केले. 168 विद्यार्थिनींनी ते सेवन केले होते. त्यापैकी 73 विद्यार्थिनींना मळमळ, उलट्या होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते