आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भावर वरुणराजा प्रसन्न; गेल्या शंभर वर्षांतील विक्रम, सर्वच प्रकल्प तुडुंब भरले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - गेल्या दोन दिवसांपासून धुमाकूळ घालणार्‍या पावसाने बुधवारी विदर्भात काहीशी विश्रांती घेतली. मात्र, गेल्या 48 तासांतील पावसामुळे नागपूर, भंडारासह विदर्भातील सर्वच जिल्ह्यांतील नदी- नाले दुधडी वाहू लागले आहेत. भंडार्‍यातील गोसीखुर्द इंदिरा सागर प्रकल्पाचे 27 दरवाजे मंगळवारी उघडण्यात आले होते, बुधवारी त्यात वाढ होऊन एकूण 33 दरवाजे उघडण्यात आले. त्यापैकी 27 दरवाजे 1 मीटरने तर 6 दरवाजे 0.50 मीटरने उघडण्यात आले. यातून 4562 दलघमी पाण्याचा विसर्ग होत आहे, तर नांद धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले असून यातून 421.82 दलघमीचा विसर्ग होत आहे.

नागपूर शहरातही गेल्या 24 तासांत रेकॉर्डब्रेक पाऊस बरसला. यापूर्वी 12 जून 1991 रोजी 315 मिमी पावसाची नोंद झाली होती. हा रेकॉर्ड कायम असला तरी त्याखालोखाल शंभर वर्षांतील 187.4 मिमी या दुसर्‍या क्रमांकाच्या सर्वाधिक पावसाची नोंद मंगळवारी करण्यात आली. यापूर्वी सन 1940 मध्ये 166.3 मिमी, 1913 मध्ये 145 मिमी, 2003 मध्ये 117 मिमी, 2002 मध्ये 117.2 मिमी आणि सन 2001 मध्ये 170 मिमी पाऊस बरसला होता.

नागपूरात पावसाचे दहा बळी
नागपुरात साधारणपणे दरवर्षी 22 ते 26 दरम्यान साधारणत: पावसाचे आगमन होत असते. गेल्या 12 वर्षात प्रथमच यंदा 10 जून रोजी पावसाचे तेही दमदारपणे आगमन झाले आहे. नागपूरमध्ये जून महिन्यात 163.6 तर जुलैमध्ये 318 मिमी पावसाची सरासरी आहे. मात्र यंदा 26 जूनपर्यंतच 453.9 मिमी पाऊस पडला. 1 ते 25 जून पर्यंत संपूर्ण विदर्भात 292. मिमी सरासरी पाऊस पडल्याची नोंद आहे. नागपूर शहर व जिल्ह्यात गेल्या चार दिवसात पावसामुळे दहा जणांचे बळी गेले आहेत.

अनेक प्रकल्प तुडूंब भरले
दमदार पावसामुळे विदर्भातील सर्वच प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्प 100 टक्के भरला असून त्यातून 221.44 दलघमी विसर्ग होत आहे. अधरपूस प्रकल्पाचे चार दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून 548 दलघमी विसर्ग होत आहे. अडाण प्रकल्पाचे 3 दरवाजे 20 सेंमी, तर 2 दरवाजे 10 सेंमीने उघडण्यात आले असून त्यातून 61.81 दलघमी विसर्ग होत आहे. नागपूर विभागातील 16 मोठे प्रकल्प तुडुंब भरले असून त्यात 1132 दलघमी पाणीसाठा आहे.

आपत्ती निवारण कक्षावरच आपत्ती
नागपूर जिल्ह्यात पूर आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या कुठलीही नैसर्गिक हानी झाल्यास त्याची माहिती मिळावी व त्यावर तत्काळ उपाययोजना करता यावी म्हणून जिल्हास्तरावर आपत्ती नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. मात्र ही माहिती वेळेवर मिळत नसल्याने विभागीय आयुक्तांनी विभागातील सर्वच निवासी उपजिल्हाधिकार्‍यांना पत्र लिहून सक्त ताकीद दिली आहे.

25 जूनपर्यंत पडलेला पाऊस
अकोला 275.5 मिमी
भंडारा 292. 8
अमरावती 238.7
बुलडाणा 216.3
चंद्रपूर 343.1
गडचिरोली 425.2
गोंदिया 231.7
नागपूर 268.3
वर्धा 245.2
वाशीम 415.2
यवतमाळ 275.8