आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाविकांसाठी विहिंपची ‘हिंदू हेल्पलाइन’ सुरू, 500 प्रवाशांना मिळाला लाभ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय महामंत्री प्रवीण तोगडिया यांच्या संकल्पनेतून प्रवासी हिंदूंसाठी उभारण्यात आलेल्या ‘हिंदू हेल्पलाइन’चा आजवर सुमारे 500 प्रवाशांना लाभ मिळाला आहे. संपूर्ण देशभर प्रवास करणार्‍या हिंदूंना या हेल्पलाइनद्वारे अपरिचित आणि अनोळखी भागातही वेळेवर मदतीचा हात मिळत आहे.

2011 मध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या हेल्पलाइनचा शुभारंभ करण्यात आला. देशभर हिंदू बांधव कामानिमित्त फिरत असतात. नवीन भागात त्यांना अनेकदा कोणत्या ना कोणत्या मदतीची गरज भासतेच. अशा वेळी ही हेल्पलाइन तुमच्या मदतीला धावून येते. प्रशासन, कायदा, न्यायव्यवस्था, आरोग्य, धार्मिक व पर्यटन या क्षेत्रांत ही हेल्पलाइन प्रवासी भारतीयांना मदत करते. संपूर्ण देशभरात 856 जिल्ह्यांत हिंदू हेल्पलाइनचे जाळे पसरले आहे.
हिंदू हेल्पलाइन ही फक्त प्रवासी हिंदूंना मदत करण्यासाठी आहे. देशभर हिंदू बांधव प्रवास करीत असतात. त्यांना अनेकदा प्रवासात मदतीची गरज असते; परंतु वेळेवर मदत मिळत नाही. त्यातूनच हिंदू हेल्पलाइनची कल्पना साकार झाल्याचे हेल्पलाईनचे उदय जोशी यांनी सांगितले.


टोलफ्री क्रमांक
विदर्भातील 11 जिल्ह्यांसह राज्यभर ही हेल्पलाइन काम करते. सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी हेल्पलाइन केंद्रे असून तेथे स्वयंसेवक तत्पर असतात. 07588682181 व 02066803300 या टोलफ्री क्रमांकांवर गरजूंनी फोन करून आपले नाव, पत्ता व मदतीचे स्वरूप सांगितल्यास त्यांना तत्काळ मदत मिळते, असा विहिंपचा दावा आहे.

अशी मिळेल मदत
गरजूंनी हेल्पलाइनच्या क्रमांकावर फोन केल्यास संपूर्ण माहिती नोंदवून घेतली जाईल. या माहितीचा एक एसएमएस त्या भागातील स्वयंसेवकाला करण्यात येईल. तसेच संबंधित स्वयंसेवकाचे नाव, पत्ता व मोबाइल क्रमांक एसएमएसद्वारे गरजूंना कळवण्यात येईल. 2011 मध्ये 148 पैकी 146, 2012 मध्ये 364 पैकी 358 अशा प्रकारे दोन वर्षांत 512 पैकी 504 जणांना या हेल्पलाइनद्वारे मदत मिळाली आहे.

ऑगस्टमध्ये ‘धन्वंतरी’
ऑगस्टमध्ये विहिंपतर्फे धन्वंतरी हेल्पलाइन सुरू होत आहे. याअंतर्गत शहरातील रुग्णालयांची माहिती देणे, मोफत तपासण्या, गरजू रुग्णांना अत्यल्प दरात रक्त उपलब्ध करून देणे, शस्त्रक्रियांमध्ये सवलत आदी सेवा देण्यात येतील. हेल्पलाइनमध्ये नागपुरातील सुमारे 200 डॉक्टरांनी नोंदणी केली असून ते सेवा देणार आहेत. सुधीर अभ्यंकर हेल्पलाइनचे प्रमुख असल्याची माहिती हेल्पलाइनचे विदर्भ प्रांतप्रमुख उदय जोशींनी दिली.