आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Horrified Experience : Death Very Closely Experiencd

महाप्रलयातील थरारक अनुभव: आपुले मरण पाहिले मी याचि देही याचि डोळा !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - केदारनाथ येथे दर्शनासाठी गेलो असतो तर परत आलोच नसतो. गौरीकुंड येथे स्नान करून चहा प्यायला थांबलो म्हणून, आम्ही जिवंत राहिलो. उत्तराखंड येथील ढगफुटीच्या प्रकोपाची भीषणता डोळ्यांसमोर होती. या काळात 24 तासांत पाण्याचे दोन घोट घेत, आपुलेच मरण पाहिले म्या डोळा, असा थरारक अनुभव डॉ. सुभाष तिवारी यांनी ‘दिव्य मराठी’कडे बोलून दाखवला.


अकोल्याचे तिवारी दांपत्य, बहीण जावयांसह चारधाम यात्रेसाठी गेले होते. 16 जूनला गौरीकुंड येथे घोड्यावाल्याने ‘केदारनाथचा रस्ता बंद झाला, तुम्ही जाऊ नका’ असा सल्ला दिला. तो जर आम्ही पाळला नसता तर अकोल्यात परतलो नसतो. या सर्व महापुरात जीवित व वित्तहानी खूप झाली असून, ती भरू निघणे शक्य नाही, असे मत डॉ. तिवारी यांच्या पत्नी अरुणा यांनी व्यक्त केले.


17 जून रोजी 20 फूट उंच महापुराची लाट आली आणि सर्व चित्र बदलले. हॉटेल सोडून सर्वांनी डोंगर गाठला. वन विभागाच्या विश्रामगृहात आश्रय घेतला. तिथे तीन दिवस त्यांनी काढले. तीन दिवसांनी पाणी ओसरल्यानंतर गुप्तकाशी येथे जाण्यासाठी या सर्वांनी 14 किलोमीटर पायी प्रवास केला. या प्रवासात अनेक मृतदेह व
वाहनांचा खच पाहिला.


50 ग्रॅम भाताचे पाचशे रुपये
गुप्तकाशीत 50 ग्रॅम भातासाठी पाचशे रुपये मोजले. हॉटेलच्या एका रूमचे भाडे पाच हजार रुपये झाल्याने दगडावर झोपण्याची आमच्यावर वेळ आली. उत्तराखंड येथील बसचालकाने फसविल्यानंतर तिथल्या पोलिसांनी काहीच मदत केली नाही. अखेर हरिद्वारनंतर सर्वांनी दिल्ली गाठली व सुटकेचा नि:श्वास सोडला.


शिवलिंग व नंदी आले धावून
उत्तराखंडचे पोलिस अधिकारी पुरातून वाचले. ज्या दिवशी हा प्रलय आला त्या दिवशी ते केदारनाथ मंदिरात होते. मंदिरात पाणी शिरल्यानंतर पाण्याच्या जोरदार लाटेने कधी शिवलिंग तर कधी नंदीचा आसरा त्यांनी घेतला. शिवमंदिरातील आतील बाजूस असलेले सर्वजण वाचले, पण बाहेरच्या सर्वांचा मृत्यू झाला. काही वाहून गेले, अशी माहिती पोलिस अधिका-याने दिल्याची आठवणीही तिवारी यांनी सांगितली.


महाराष्ट्र सदन झाले घर
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्र सदनात भेट घेत दिलासा दिला. अरुणा तिवारी यांनी थेट मुख्यमंत्र्यांना रेल्वे आरक्षणाची विनंती केली. त्यांनी तत्काळ तशी सोय करून दिली. सर्व प्रवाशांना प्रत्येकी दोन हजार रुपयांची मदत केली. मदत केंद्राचे प्रमुख प्रवीण टाके व त्यांचे 60 सहकारी पर्यटकांना सावरण्यासाठी मदत करत आहेत. जेवण व राहण्याची सोय केल्याची माहिती डॉ. तिवारी यांनी दिली.