आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हायटेंशनचे ‘टेंशन’; वीज कंपनीकडून 100 नागरिकांना नोटीस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरातून चार मुख्य हायटेंशन वीजवाहिनी जात आहेत. यामध्ये अमरावती-बडनेरा ही 220 केव्हीचे वहन करणारी वाहिनी पूर्वा ले-आउट, चांगापूर, पंचवटी परिसरातून जाते; तसेच अमरावती ते अंबाझरी 132 केव्ही आणि 220 केव्ही अशा दोन वाहिनी अर्जुन नगर परिसरातील प्रिया टाउनशिप भागातून जाते. अमरावती ते लालखडी ही 132 केव्हीची वाहिनी सौरभ कॉलनी, नूरनगर या भागातून आणि अमरावती-मूर्तिजापूर ही 66 केव्हीची हायटेंशन वाहिनी शहरातील वाहिन्यांपैकी सर्वांत जुनी असून, ही जुन्या बायपास मार्गाने जाते. या वाहिनीमुळे यशोदानगर परिसरातील अनेक घरांना धोका निर्माण झाला आहे. नागरी वस्तीतून गेलेल्या या वाहिनीची उभारणी 50 ते 60 वर्षांपूर्वी झालेली आहे. त्यावेळी कोणत्याही प्रकारची नागरी वस्ती हायटेंशनच्या आजूबाजूने नसल्याचे अतिउच्चदाब बांधकाम संचालन व सुव्यवस्था परिमंडळाच्या अधिकार्‍यांनी सांगितले. मात्र, दिवसेंदिवस वाढलेली लोकसंख्या, शहराचा वाढलेला विस्तार लक्षात घेता, या हायटेंशन वीजवाहिनी सध्या काही नागरिकांच्या जिवावर बेतत असल्याचे दिसत आहे. कारण अतिउच्चदाब वीजवाहिनीच्या दोन्ही बाजूंनी किमान नऊ मीटरचा परिसर मोकळा असणे अपेक्षित आहे. या वाहिनीमधून पुरवठा केली जाणारी वीज सतत सुरू असते, या वीजवाहिनी घातक असल्यामुळे त्यापासून सुरक्षित अंतर ठेवणे आवश्यक आहे.

शहरात अलीकडच्या काळात अतिउच्चदाब वीजवाहिनीमुळे चार अपघात झाले आहेत. यामध्ये एका बालकाचा अंत झाल्याची घटना दीड वर्षांपूर्वी सौरभ कॉलनी परिसरात घडली; तसेच घरावर ताडपत्री टाकण्यासाठी गेलेल्या युवकाला शॉक लागल्यामुळे भाजल्याची घटना पाच दिवसांपूर्वी यशोदानगर भागात घडली. या वेळी वीज वितरण कंपनीने ही अतिउच्चदाब वाहिनी स्थलांतरित करणे शक्य नसल्याचे सांगितले. जानेवारी 2014 पासून आतापर्यंत वीज कंपनीच्या अतिउच्चदाब बांधकाम संचालन व सुव्यवस्था परिमंडळाकडून या चारही वीजवाहिनीच्या परिसरातील शंभर नागरिकांना नोटीस देण्यात आली आहे. मात्र, यात नागरिकांचाही दोष नसल्याने या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा सर्वसंमत्तीनेच काढावा लागणार आहे.
नागरिकांनी सुरक्षित अंतर सोडावे
नागरिकांनी घर बांधतेवेळी हायटेंशन वाहिनीपासून सुरक्षित अंतर सोडून घर बांधावे. वीजवाहिनी या 50 ते 60 वर्षांपूर्वी जुन्या आहेत. त्या स्थलांतरित करणे कठीण काम आहे. अशावेळी नागरिकांनी स्वसुरक्षेसाठी खबरदारी घ्यावी.
सुनील शेरेकर, कार्यकारी अधिकारी, अतिउच्च्दाब बांधकाम संचालन व सुव्यवस्था परिमंडळ, अमरावती.

(संग्रहीत छायाचित्र)