अमरावती - ‘स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासोबतच गरजू मुलींच्या शिक्षणाचा ज्वलंत प्रश्न तडीस नेण्याचा प्रयत्न करणार,’ असा मनोदय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मंगळवारी अमरावतीत व्यक्त केला. स्वयंसेवी संस्था व सरकारी मदतीच्या माध्यमातून आणि प्रसंगी कायदेशीर कारवाई व विरोध करणा-यांविरोधात आंदोलन यांद्वारे संबंधित प्रश्नांच्या सोडवणुकीचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
अमरावती येथे बृहन्महाराष्ट्र योग परिषदेद्वारे आयोजित राज्यस्तरीय योगासन स्पर्धा व योग संमेलनाच्या उद्घाटनासाठी त्या आल्या होत्या. या वेळी त्यांनी ‘दिव्य मराठी’सोबत संवाद साधला. ‘पती राजकारणात आहेत, तेच
आपल्यासाठी पुरेसे आहे. मला राजकारणात फारशी रुची नाही. देवेंद्र मुख्यमंत्री असल्यामुळे राज्याचा गाडा हाकताना त्यांना सदैव घराबाहेर राहावे लागणार. त्यामुळे आई (सासूबाई) व मुलीकडे लक्ष देण्याची जबाबदारी माझ्यावर राहणार आहे. घराची जबाबदारी समर्थपणे पेलली, तरी मला समाधान आहे,’ असे त्या म्हणाल्या. राज्यातील जनतेने आमच्या खांद्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे. याची देवेंद्र व मला जाणीव आहे. त्यामुळेच लोकांच्या अपेक्षांवर खरे उतरण्यासाठी आम्ही परिश्रम घेऊ, असेही त्या म्हणाल्या.