आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • If Chief Minister Go Away From Reservation, Then Agitation

मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचा शब्द फिरवल्यास आंदोलन, धनगर समाज संघर्ष समिती इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली मुदत संपूनही महाधिवक्त्यांसोबत बैठक न झाल्याने संभ्रमाचे वातावरण आहे. यासंदर्भात धनगर समाज संघर्ष समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘मुख्यमंत्र्यांनी आता शब्द फिरवल्यास आंदोलन अधिक आक्रमक करण्यात येईल,’ असा इशारा संघटनेचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिला. या विषयावर चर्चा करण्यासाठी महाधिवक्त्यांसोबत बैठक घेऊ, असे मुख्यमंत्री म्हणाले होते. प्रत्यक्षात गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्यासोबत बैठक झाली. यासंदर्भात पुन्हा बैठक घ्यावी लागेल, परंतु महाधिवक्त्यांसोबत कधी बैठक घ्यायची हे ठरलेले नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

एकीकडे आंदोलन आक्रमक करण्याचा इशारा देतानाच दुसरीकडे सरकारला काही अडचणी असतील, तर समजून घेऊ, असा सूरही त्यांनी लावला. आणखी काही िदवस वेळ देऊ. मुख्यमंत्र्यांना दिलेला शब्द पूर्ण करावाच लागेल. नाहीतर आंदोलन आक्रमक करू, असा इशारा महात्मे यांनी दिला आहे.
काय म्हणाले होते मुख्यमंत्री : धनगर समाज संघर्ष समितीतर्फे ४ जानेवारी रोजी आयोजित धनगर आरक्षण अंमलबजावणी अधिवेशनात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर आरक्षणाबाबत पंधरा दिवसांत महाधिवक्त्यांसोबत बैठक घेण्यात येईल, अशी घोषणा केली होती. निवडणुकीच्या आधी दिलेले धनगर आरक्षणाचे वचन आम्ही पूर्ण करणार आहोत. महायुती शब्दापासून मागे फिरणार नाही, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली होती.
या ठरावांबाबतही मौन : सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर हे नाव देण्यात यावे, अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यानगर हे नाव देण्यात यावे, शेळी मेंढी विकास महामंडळाच्या निधीत वाढ करण्यात यावी, धनगर समाज आरक्षणाबाबत समिती नको, आरक्षणाची अंमलबजावणी त्वरित करण्यात यावी, आदी ठराव अधिवेशनात पारित करण्यात आले. या बाबतही धनगर समाजाचे नेते सोयीस्कर मौन बाळगून आहेत.