आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयातील अवैध गर्भपात प्रकरणाचे ‘पोस्टमार्टम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयातील अवैध गर्भपातप्रकरणी तहसीलदारांच्या चमूने रविवारी प्राथमिक चौकशी केली. गर्भपाताचे प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी दिले होते.

सर्वोपचार रुग्णालयात 6 जुलै रोजी गरोदर युवती भरती झाली होती. प्रसूतीवेदना वाढल्याने तिचा गर्भपात करण्यात आला. एका डॉक्टरने तिच्याशी ठेवलेल्या अनैतिक संबंधातून ती गर्भवती राहिली होती. रुग्णालय परिसरात यासंबधी भित्तीपत्रकही लावण्यात आले होते. रविवारी सकाळी तहसीलदार राजेश्वर हांडे, पीसीपीएनडीटी पथकातील वैद्यकीय अधिकारी डॉ. भावना मेश्राम, कार्यक्रम समन्वयक योगेश फरफट यांच्यासह तहसील कार्यालयातील कर्मचार्‍यांच्या चमूने प्राथमिक चौकशी केली. चमूने प्रसूतिगृह, शस्त्रक्रिया गृहाची पाहणी केली.

फुटेज मिळण्यात अडसर...
स्त्रीरोग व प्रसूती विभागाच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लागले आहेत. चमूने सीसीटीव्हीतील फुटेज मिळण्यासाठी चमूने महाविद्यालय प्रशासनाशी संपर्क साधला. मात्र, प्रशासनाने सीसीटीव्ही कॅमेरे प्रणालीचा पासवर्ड माहीत नसल्याने आणि टेक्निशियनदेखील उपस्थित नसल्याने फुटेज देण्यास असमर्थता दर्शविली.

चमूने नोंदविले जबाब...
तहसीदारांच्या पथकाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयात घटनेशी संबंधित असलेले डॉक्टर आणि परिचारिकांचे जबाब नोंदविले. डॉक्टर आणि परिचारिकांनी घटनाक्रम विषद केला.

मलाही संशय
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयातील सोनोग्राफी केंद्राची तपासणी केली. या युवतीने गर्भपाताच्या गोळ्या घेतल्या असाव्यात किंवा तिला देण्यात आल्या असाव्यात, असे रुग्णालयातील परिचारिकांचे म्हणणे आहे. मलाही असाच संशय आहे.
-डॉ. फारुख शेख, पीसीपीएनडीटी पथक (अकोला शहर) प्रमुख

फुटेज मिळवण्यासाठी प्रयत्न
‘सर्वोपचार’तील गर्भपाताची प्राथमिक चौकशी केली. सीसीटीव्ही कॅमेरेमधील फुटेज मिळण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाशी संपर्क साधला आहे.’’ -राजेश्वर हांडे, तहसीलदार.

सोनोग्राफी केंद्राची तपासणी
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयातील सोनोग्राफी केंद्राची पीसीपीएनडीटी पथकाचे प्रमुख डॉ. फारुख शेख आणि कार्यक्रम समन्वयक योगेश फरपट यांनी तपासणी केली. त्यांनी रजिस्टरमधील नोंदी तपासल्या. या केंद्रात जुलैत सोनोग्राफी केली गेली नसल्याचे निष्पन्न झाले.

गर्भपात नियमबाह्य नाही
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयात नियमबाह्य गर्भपात केला गेला नाही. वेदना झाल्याने त्या युवतीची मुदतपुर्व प्रसुती झाली. या प्रक्रियेमध्ये डॉक्टर, कर्मचार्‍यांकडून कोणतेही नियमबाह्य कृत्य झालेले नाही.
-डॉ. एस. के. बोभाटे, अधिष्ठाता.