आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यभरात सर्रास होतोय गोळीबार; दोघांची हत्या, तिघे जखमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

किरकोळ कारणावरून किंवा पूर्ववैमनस्यातून गोळीबार करून हत्या करण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात
वाढले आहे. नांदेड, पुणे व नागपूर शहरात गेल्या 24 तासांत अशा तीन घटना घडल्या. त्यात दोघांचा मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी आहेत. मुंबईत भाजपच्या कार्यकर्त्याची घरात घुसून हत्या करण्यात आली.

नागपुरात रोडरोमियोचा मुलीच्‍या वडीलांवर गोळीबार

नागपूर- मुलीची छेड काढणार्‍या रोडरोमिओने तिच्या पित्यावर गोळीबार केला. यात दुर्दैवी पिता गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना सोमवारी गिट्टीखदान हद्दीत घटली. उमेश यदुनाथ पांडे (40) असे जखमीचे नाव आहे.
कुणाल शर्मा (22, रा. गिट्टीखदान, नागपूर) असे आरोपी युवकाचे नाव आहे. उमेश पांडे हे मोरारजी मिल, बुटीबोरी येथे नोकरी करतात. कुणालने पांडे यांच्या मुलीची छेड काढली होती. त्यामुळे पांडेंनी कुणालला खडसावले होते. याचा राग त्याच्या मनात होता. सोमवारी सकाळी पांडे बाजारात गेले होते. या वेळी कुणाल फ्रेंड्स कॉलनी स्मशानभूमीसमोर पांडेंच्या दुचाकीला आडवा झाला. या वेळी कुणालसोबत तोंड बांधून एक युवक होता. त्याने देशी कट्ट्याने झाडलेली गोळी पांडेंच्या डाव्या खांद्यात घुसली. पांडेंनी देशी कट्टा हिसकावल्याने ते दोघे दुचाकी सोडून पळून गेले.


मुंबईत भाजप कार्यकर्ता हल्ल्यात ठार
मुंबई । भारतीय जनता पक्षाच्या एका पदाधिकार्‍याची अज्ञात हल्लेखोरांनी घरात घुसून हत्या केल्याची घटना सोमवारी मुंबईत घडली. वसंत पाटील असे या पदाधिकार्‍याचे नाव आहे. सोमवारी सकाळी काही जणांनी घरात घुसून त्यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने 35 वार केले. त्यांना मुलुंड येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. पाटील यांनी माहिती अधिकाराचा वापर करून माजी नगरसेवकाच्या गैरकारभाराचे बिंग फोडले होते.


पुण्यात मद्यधुंदाने केली मित्राची हत्या
पुणे । दारूच्या नशेत मित्राची गोळी झाडून हत्या केल्याची घटना पुण्यात रविवारी रात्री घडली. नितीन लक्ष्मण विरलक (25) असे मृताचे नाव आहे. आकाश भालेराव याला पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी रात्री खराबवाडीतील हॉटेल अथर्वमध्ये दोन मित्रांसह पार्टी करताना वाद झाल्याने आकाशने नितीनवर गोळी झाडली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.


नांदेड येथे गोळीबारात पिता-पुत्र गंभीर जखमी

नांदेड । नाळेश्वर-ढोकी मार्गावर रविवारी मोटारसायकलवरून जाणार्‍या पिता-पुत्रावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात गंगाधर मारोतराव लबडे (45) व प्रवीण गंगाधर लबडे (25, रा. ढोकी) हे दोघे गंभीर जखमी झाले. दोघांनाही नांदेड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रविवारी रात्री ढोकीपासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या कडेला थांबलेल्या तीन हल्लेखोरांनी रिव्हॉल्व्हरमधून दोघांवरही एक-एक गोळी झाडली. एक गोळी प्रवीणच्या तर दुसरी त्याच्या वडिलांच्या पोटात घुसली. आजूबाजूच्या शेतकर्‍यांनी दोघांना नांदेड येथे रुग्णालयात दाखल केले. लबडे पितापुत्रांची रक्कम व अंगठी सुरक्षित असल्याने हल्ला वाटमारीसाठी झाला नसल्याचे समजते. मात्र, नेमके कारण स्पष्ट झाले नाही.

(फोटोः नागपुरातील गोळीबारात जखमी झालेले उमेश पांडे.)