आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चुकीच्या इंजेक्शनमुळे दोन बालकांचा यवतमाळमध्‍ये मृत्यू, डॉक्टरला मारहाण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ - टिळकवाडी परिसरातील डॉ. संजीव जोशी यांच्या चिरायू रुग्णालयात मंगळवारी सकाळी उपचार सुरू असलेल्या दोन बालकांचा मृत्यू झाला. चुकीचे इंजेक्शन दिल्यानेच ही बालके दगावल्याचा आरोप करत रुग्णांच्या नातेवाइकांनी डॉक्टरांना मारहाण केली, तसेच पोलिसातही तक्रार देण्यात आली.

कुणाल रमेश राठोड (1 वर्ष, रा. शिवणी ता. घाटंजी) आणि प्रथमेश शालीक बिबेकर (17 महिने, रा. आकुर्ला, ता. जैनद जिल्हा आदिलाबाद) अशी मृतांची नावे आहेत. ताप आल्याने कुणालला 31 ऑगस्ट रोजी दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातील महिला कर्मचार्‍याने इंजेक्शन देताच त्याला झटके सुरू झाले. यानंतर त्याला अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. त्याच ठिकाणी त्याचा मृत्यू झाल्याचे त्याचे वडील रमेश राठोड यांनी सांगितले. दुसरा बालक प्रथमेशलाही तापेमुळे 2 सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आले होते. इंजेक्शन देताच तोही लाल काळा पडला आणि काही वेळातच मृत्यू झाल्याचे त्याच्या आईचे म्हणणे आहे.

मृत बालकांच्या नातेवाइकांनी डॉक्टरांना जाब विचारला तेव्हा त्यांना उत्तर देता आले नाही. त्यामुळे चिडलेल्या नातलगांनी डॉ. संजीव जोशी यांना मारहाण केली. मृतांच्या नातेवाइकांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून, डॉक्टरांनी केलेल्या चुकीच्या उपचारांमुळे मुलांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, दोन्ही रुग्णांवर आपण योग्यच उपचार केले असून त्यांच्या नातेवाइकांचे आरोप निराधार असल्याचे डॉ. संजीव जोशी यांनी सांगितले.