आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Independence Day Special: Father And Son Nation Love

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्वातंत्र्य दिन विशेष: बाप लेकाची देशभक्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - डहाके कुटुंबातील वडील आणि मुलगा दोघांनीही भारतीय लष्करात सेवा करताना पाक सीमेवर देशाचे रक्षण केले आहे. देश 67 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना सीमा लढवून मातृभूमीचे रक्षण करणार्‍या सैनिकांच्या योगदानास उजाळा निश्चितच प्रेरणादायक ठरतो. डहाके कुटुंबीतील बाप-लेकांच्या जोडीनेही शहरवासीयांसमोर देशसेवेचा अनोखा आदर्श मांडला आहे.


प्रमोद डहाके सांगतात , ‘‘अनुशासन आणि देशसेवेची संधी यामुळे सैन्याकडे ओढा होताच. 17 वर्षे सैन्यात काढल्यानंतर कुटुंबातील आणखी सदस्याने देशसेवा करावी, असे वाटते. मोठा मुलगा विशालला याबाबत नेहमी सांगायचो. त्याचीही इच्छा होतीच. आता तोही भारतीय सैन्यदलात सीमेवर तैनात आहे.’’


ते 117 इंजिनियर रेजिमेंट, श्रीनगर येथून निवृत्त झाले. जम्मू-काश्मिरात पाकच्या सीमेवर तैनात विशालचा अभिमान आहे, असेच वाक्य कुटुंबातील प्रत्येकाच्या तोंडी आहे. त्याची मार्च 2002 मध्ये बंगळूरला पहिली नेमणूक झाली. विशालची पत्नी स्नेहल तीन महिन्याच्या सर्मथसोबत आपल्या सासू-सासर्‍यांकडे राहते.


डहाके सांगतात, ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’च्या सरावात माझा समावेश होता. 1987 च्या ‘ऑपरेशन दिग्विजय’मध्येही होतो. 1992 मध्ये सीमारेषेवर तब्बल आठ तास गोळीबार झाला. त्यावेळी दैव बलवत्तर म्हणून जीव वाचला. पण, देशासाठी प्राणांची चिंता नव्हती.’’


विशालची पत्नी स्नेहल सांगते, विशालचे स्थळ आले तेव्हा आनंदाने होकार दिला. सैनिकासोबत संसार हे वेगळेच आव्हान आहे. पती सीमेवर तैनात असल्याची भीती तर असते, पण त्यांच्या देशसेवेचा अभिमानही आहे. एक-दोन दिवसाआड फोन येतो. समाधान वाटते. ते आले, की दिवाळी-दसराच असतो. लहानग्याला वडिलाची कमतरता भासू द्यायची नाही, हे ते आवर्जून सांगतात. टीव्हीवर कारगिलचे दृश्य बघताना मनात भीती दाटते. पण, कुटुंबातील सगळे सदस्य हिंमत देतात. विशालच्या आई सुशीला म्हणाल्या, ‘‘पती सैन्यात होते. मुलगाही सीमेचे रक्षण करीत आहे. तीन मुले जरी सैन्यदलात असती तरी मला किंचितही दु:ख वाटले नसते. कुटुंब, गोतावळा याहून देशसेवा र्शेष्ठ आहे, हे मी जाणते’’.