आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेगळ्या विदर्भासाठी नागपुरात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसह विदर्भवाद्यांचा शंखनाद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नागपूर- नागपूर कराराला साठ वर्षे पूर्ण झाल्याचा मुहूर्त साधून विदर्भवाद्यांनी शनिवारी वेगळ्या राज्याच्या आंदोलनाचा शंखनाद केला. विदर्भाचे वेगळे राज्य घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, या निर्धारासह शेकडो तरुण सहभागी झालेल्या नागपूर-सेवाग्राम पदयात्रेला दणदणीत सुरुवात झाली, तर विदर्भ राज्य संयुक्त कृती समितीच्या वतीने नागपूर कराराची होळी करण्यात आली.

नागपूर कराराच्या माध्यमातून विदर्भाचा प्रांत महाराष्ट्रात सामील झाला. या कराराला साठ वर्षे पूर्ण होण्याच्या दिवशीच विदर्भवाद्यांनी विदर्भ राज्याच्या आंदोलनाचा शंखनाद केला. यूथ फॉर विदर्भ स्टेट संस्थेच्या वतीने डॉ. आशिष देशमुख यांच्या नेतृत्वात शनिवारी सकाळी नागपूर-सेवाग्राम पदयात्रेला सुरुवात झाली.

नागपुरातील इतवारी शहीद चौक परिसरातील विदर्भ चंडिका मंदिरापासून सुरू झालेल्या या पदयात्रेत सहभागी होण्यासाठी महाविद्यालयीन तरुणांनी मोठी गर्दी केली होती. विदर्भ राज्य संयुक्त कृती समितीचे नेते अहमद कादर, शेतकरी संघटनेचे नेते राम नेवले, माजी पोलिस महासंचालक प्रबीरकुमार चक्रवर्ती व अन्य नेते या वेळी उपस्थित होते. सुरुवातीला विदर्भ चंडिकेची आरती करण्यात आल्यावर प्रतीकात्मक घंटानाद करण्यात आला.

डॉ. आशिष देशमुख यांच्या हस्ते नागपूर कराराच्या प्रतींची होळी करण्यात आली. या वेळी विदर्भ राज्य लेके रहेंगेची जोरदार घोषणाबाजीने परिसर दुमदुमून गेला होता. आता विदर्भ राज्य मिळवल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार करून देशमुख म्हणाले, मागील साठ वर्षांपासून विदर्भ गुलामगिरीत जगत आहे. आता नागपूर कराराचे जोखड फेकून देऊन विदर्भाला मुक्त करण्याची वेळ आली आहे.

विदर्भाच्या पदरी अन्यायच
साठ वर्षे महाराष्ट्रात राहून विदर्भाच्या पदरी अन्यायच आला. शेतकर्‍यांच्या आत्महत्या होत आहेत. कुपोषणामुळे हजारो बालमृत्यू झाले. उद्योगधंदे नसल्याने रोजगाराअभावी तरुणवर्ग देशोधडीला लागला आहे. त्यामुळे आता वेगळ्या विदर्भाशिवाय पर्याय राहिलेला नाही. युवकांच्या सहभागामुळे तेलंगणाचे आंदोलन यशस्वी ठरले. तेच आता विदर्भात करायचे असल्याचे सांगत देशमुख यांनी जास्तीत जास्त संख्येने पदयात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केले. रविवारी ही पदयात्रा वर्धेच्या दिशेने प्रवास करणार आहे.

नागपूर कराराची होळी, शंभरांवर कार्यकर्त्यांना अटक
विदर्भ राज्य संयुक्त कृती समितीच्या वतीने नागपुरातील व्हरायटी चौकात नागपूर कराराची होळी करण्यात आली. समितीचे संयोजक अहमद कादर, शेतकरी संघटनेचे नेते राम नेवले, माजी आमदार भोला बढेल, उपेंद्र शेंडे यांच्या नेतृत्वात सुमारे दोनशेवर कार्यकर्त्यांनी नागपुरातील व्हरायटी चौकातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ कराराच्या प्रती जाळल्या. या वेळी सीताबर्डी पोलिसांनी शंभरावर कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या कार्यकर्त्यांना पोलिस मुख्यालय मैदानावर नेण्यात आल्यावर तेथे त्यांची सुटका करण्यात आली. तत्पूर्वी, कार्यकर्त्यांनी व्हरायटी चौकात रास्ता रोको आंदोलनही केले.