आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Developed Under Ambedkar Ideology, Sharad Pawar Said

आंबेडकरांच्या विचारातूनच भारताची जडणघडण, शरद पवारांचे प्रतिपादन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उद्याचा भारत कशा पद्धतीने घडावा, याचा मूलभूत आणि सखोल विचार केला होता. जलसंपदा आणि ऊर्जामंत्री असताना त्यांनी पाणी साठवणुकीसंबंधी मूलभूत चिंतन केले. पंजाबमधील भाकरा नांगल धरणाची उभारणीही बाबासाहेबांच्या संकल्पनेतूनच झाली. आजच्या पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनची पायाभरणी त्यांनीच केली. आजही आंबेडकरांच्या विचारातूनच भारताची जडणघडण सुरू आहे’, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष व केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी रविवारी केले. नागपूर येथील दीक्षाभूमी येथे आयोजित धम्मचक्र प्रवर्तनदिनाच्या मुख्य सोहळय़ात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री प्रफुल्ल पटेल, जिल्हय़ाचे पालकमंत्री शिवाजीराव मोघे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख, रोहयो मंत्री नितीन राऊत, वित्त व नियोजन राज्यमंत्री राजेंद्र मुळक, महापौर अनिल सोले आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांनी केले. स्मारक समितीचे अध्यक्ष रा. सु. गवई यांचे समयोचित भाषण झाले.


उद्योगात पुढे यावे : शिंदे
सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, दलित समाज एकवटण्यासाठी सर्वंकष नेतृत्व उदयास येण्याची गरज आहे. दलित समाजातील तरुणांनी उद्योग व्यवसायात पुढे यावे असे आवाहनही त्यांनी केले. तर ‘बाबासाहेबांनी बांधलेल्या भक्कम पायावर समतेची इमारत उभी करू,’ असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.


पावसाची हजेरी
धम्मचक्र प्रवर्तनदिन सोहळय़ात देश- विदेशातील दहा लाखांहून अधिक अनुयायी उपस्थित होते. मुख्य सोहळा सायंकाळी 6 वाजता होता. परंतु दुपारी 4 वाजता पाऊस आला. तो रात्रीपर्यंत अधूनमधून बरसतच होता. त्यामुळे छत्र्या, मेनकापड याचा आधार घेत अनुयायी उभे होते. काहींनी आजूबाजूला आडोसा शोधल्याने मैदानातील गर्दी कमी झाली होती.