आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्‍तान बनावट प्रदेश, भारत केवळ हिंदूंचा देश नाही : मार्कंडेय काटजू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - भारत हा केवळ हिंदूंचा देश नाही आणि केवळ हिंदू हेच येथील प्रथमश्रेणी नागरिक नाहीत, असे ठणकावून सांगतानाच हा देश हिंदूंइतकाच इतर धर्मीयांचाही आहे, असे स्पष्ट प्रतिपादन प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष न्या. मार्कंडेय काटजू यांनी शुक्रवारी केले. नागपुरातील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

‘भाषा, पंथ, संप्रदाय, जात, धर्म, संस्कृती, रीतीरिवाज आदी सर्वच बाबतीत वैविध्य असलेल्या या देशात धर्मनिरपेक्षता हाच एकमेव उपाय आहे. केवळ धर्मनिरपेक्षताच या देशाला जोडून ठेवू शकते हे लक्षात घेता सर्वांना समान आदर हे सूत्र अंगीकारले पाहिजे,’ असेही न्या. काटजू यांनी सांगितले. जातीयता आणि धर्मांधतेच्या दुष्टचक्रात आम्ही अडकलो आहोत. आजही निवडणुकीत उमेदवाराची गुणवत्ता वा चारित्र्य पाहून नव्हे, तर जात वा धर्म पाहून मतदान केले जाते. हा मागासलेपणा थांबला पाहिजे. येथे कोणी हिंदू, मुस्लिम वा शीख राष्ट्रवादी नसून सर्व भारतीय राष्ट्रवादी आहोत, असेही काटजू म्हणाले.

देशातील मीडिया तसेच बुद्धिवंतांनी वैज्ञानिक विचारांचा प्रचार केला पाहिजे. दुर्दैवाने आज मीडिया भरकटला आहे. क्रिकेटपटू, फिल्मस्टार्स तसेच राजकारण्यांच्या बातम्यांचा रतीब घालताना वास्तवाकडे मीडियाचे दुर्लक्ष होत असल्याची टीकाही न्या. काटजू यांनी केली.

पाकिस्तान बनावट प्रदेश
पाकिस्तान हा देश नव्हे, तर एक बनावट प्रदेश आहे. ब्रिटिशांनी हिंदू-मुस्लिमांमध्ये भांडणे होण्यासाठी त्याची निर्मिती केली. पाकिस्तानातही पंजाब, बलुचिस्तान, सिंध हे प्रांत असून त्यांचा संबंध भारताशी आहे. त्यामुळे पाकिस्तान, पंजाब, बलुचिस्तान, सिंध, बांगलादेश व हिंदुस्थाननेही परत एक व्हावे, अशी अपेक्षा काटजू यांनी व्यक्त केली.

पाकिस्तानचा पागलखाना
धर्म ही वैयक्तिक बाब आहे. प्रत्येकाला आपल्या धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य आहे, परंतु धर्म सत्तेशी जोडता कामा नये. धर्माधिष्ठित देश चालू शकत नाही. पाक हे याचे धडधडीत उदाहरण आहे. मुस्लिम राज्य असलेल्या पाकिस्तानचा आज नरक झालेला आहे. तेथे अराजक माजले असून या देशाचा पागलखाना झालेला आहे, असे काटजू म्हणाले.