आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शत्रूंसाठी भविष्यात भारतीय सैनिक ठरणार टर्मिनेटर!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - देशाच्या संरक्षणासाठी भविष्यात लढणारा सैनिक मानवी क्षमतांच्या पलीकडे जाऊन काम करणारा, अल्ट्रामॉडर्न उपकरणांनी सुसज्ज व स्वयंपूर्ण असेल. आधुनिक उपकरणांच्या साहाय्याने कित्येक किलोमीटरवरील परिस्थितीचा अंदाज, प्रगत उपग्रह यंत्रणेच्या माध्यमातून कुठूनही नियंत्रण केंद्राशी संवाद व आधुनिक शस्त्रांसह लढताना स्वत:चा बचावदेखील तो उत्तम पद्धतीने करू शकेल.

टर्मिनेटर, ट्रान्सफॉर्मरसारख्या इंग्रजी चित्रपटांत दिसणार्‍या सुसज्ज अल्ट्रामॉडर्न योद्धय़ाची ही कल्पना प्रत्यक्षात साकार करण्याच्या दृष्टीने संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या (डीआरडीओ) देशभरातील प्रयोगशाळांमध्ये सध्या एका खास प्रकल्पावर काम सुरू झाले आहे. डीआरडीओचे माजी महासंचालक व संरक्षण मंत्र्यांचे माजी वैज्ञानिक सल्लागार डॉ. व्ही. के. सारस्वत यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची माहिती दिली.

शनिवारपासून नागपुरात सुरू झालेल्या विज्ञान भारतीच्या पहिल्या राष्ट्रीय संमेलनासाठी डॉ. सारस्वत आले आहेत. डीआरडीओच्या ‘सोल्जर अँज अ सिस्टीम’ या प्रकल्पाची माहिती देताना डॉ. सारस्वत यांनी भारतीय संरक्षण दलांमधील भविष्यातील सैनिक कसा असेल, हे विषद केले.

हा सैनिक साकारण्यासाठी डीआरडीओ प्रयोगशाळांतील काम प्रगतीपथावर असून त्यात तंत्रज्ञानाच्या स्वदेशीकरणाला प्राधान्य दिले जात आहे. प्रमाणात युरोप व चीनमध्येही अशाच प्रकल्पांवर काम होत आहे.

एफडीआय वाढवण्याची गरज :
डॉ. सारस्वत म्हणाले, संरक्षण दलांसाठी सामग्रीच्या उत्पादनात विदेशी गुंतवणुकीचे प्रमाण किमान 49 टक्क्यांपर्यत वाढविण्याची नितांत गरज आहे. मात्र, अशा पद्धतीने येणार्‍या तंत्रज्ञानावर भविष्यात आमचे स्वामित्त्व असेल, अशी अट घालूनच त्याचा स्वीकार करायला हवा. यासंदर्भात त्यांनी रशियाच्या सहकार्याने विकसित झालेल्या ब्राम्होस क्षेत्रणास्त्राचे उदाहरण दिले.

तंत्रज्ञानात आघाडी :
डीआरडीओने गेल्या 15 ते 17 वर्षाच्या कालावधीत क्षेपणात्र निर्मितीच्या क्षेत्रात मोठा पल्ला गाठला. पृथ्वी, अग्नी, नाग, आकाश व अन्य क्षेपणास्त्रांच्या निर्मितीत 80 टक्के स्वदेशी बनावटीच्या उपकरणांचा वापर करणे शक्य झाले आहे. हलके लढाऊ विमान (एलसीए), मानवरहित विमान (यूएव्ही) तसेच संरक्षण दलांसाठीच्या सेन्सर्सच्या निर्मितीतही अध्र्यापेक्षा जास्त स्वदेशी उपकरणांचा वापर होत आहे.

बंदीचा फायदाच :
भारताच्या अणुचाचण्यानंतर आपल्याला जगाने तंत्रज्ञानाचा पुरवठा नाकारला. मात्र, त्याचा फायदा असा झाला की आम्ही ते स्वत:च विकसित करण्याच्या दृष्टीने मोठी झेप घेतली, असेही डॉ. सारस्वत म्हणाले.

‘सोल्जर अँज अ सिस्टिम’
- मॉड्युलर आयुधांचा लढाई व इतर कामांसाठी उपयोग होईल. हे शस्त्र एक अख्खे युनिटसच असेल. त्याची संहारकता अनेक कॅलिबरची असेल. चौथे कॅलिबर ग्रेनेड लाँचरला जोडलेले असेल.
- गणवेशाच्या आत सैनिकाच्या अंगावरील कपड्यांवर त्याचे आरोग्याची सेकंदा-सेकंदाला तपासणी करणारे सेन्सर्स असतील. यामुळे गरज पडल्यास त्याला तत्काळ वैद्यकीय मदत पुरवता येईल.
- हेडसेटसह सुसज्ज छोटे कॉम्प्युटर, फ्लॅश लाइट, थर्मल सेन्सर, नाइट व्हिजन डिव्हाइस. मिट्ट अंधारातही सैनिकाला हेल्मेटवरील उपकरणांद्वारे अनेक किमीवरील परिस्थिती कळेल. ते उपग्रह तंत्रज्ञानाद्वारे नियंत्रण कक्षाशी जोडलेले असेल.
- अंगावर अत्यंत हलके कपडे व बुलेटप्रूफ व वॉटरप्रूफ प्रूफ ज्ॉकेट. यामुळे अधिक वजन सोबत घेता येईल. अण्वस्त्र उत्सर्ग, रासायनिक व जैविक हल्लारोधक. उपकरणांसाठीची उर्जा सैनिकाच्या चालण्यातून निर्माण होईल.

(डेमो पिक)