आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Insited Of IIM School Of Planing And Architecture In Aurangabad

‘आयआयएम’एेवजी आैरंगाबादेत स्कूल आॅफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर हाेणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर/औरंगाबाद - औरंगाबादकरांच्या भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या (आयआयएम) मागणीला उतारा म्हणून स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर देण्याचा मार्ग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोधून काढला आहे. तशी घोषणाच त्यांनी सोमवारी विधानसभेत केली. त्यामुळे आयआयएम नागपूरलाच होणार यावर एकप्रकारे शिक्कामोर्तब झाले आहे.

केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी आयआयएम देण्याची घोषणा केल्यापासून ही संस्था औरंगाबादमध्येच व्हावी, असा प्रयत्न सुरू झाला. चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चरने (सीएमआयए) त्यासाठी विशेष पुढाकार घेतला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण औरंगाबादला आले होते. तेव्हा त्यांच्याकडे ही मागणी करण्यात आली होती. मात्र, त्यांनी त्याबाबत फारशी अनुकुलता दाखवली नव्हती. सत्तांतरानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्याकडे संस्थेसाठी पाठपुरावा सुरू झाला. ही संस्था आपल्याकडे खेचून आणूच, अशी ग्वाही भाजपच्या मराठवाड्यातील मंत्री आणि आमदारांनीही दिली होती. असे असले तरी आयआयएम नागपूरला नेण्याची मुख्यमंत्री फडणवीस यांची योजना असल्याचे 'दिव्य मराठी'ने स्पष्ट केले आणि औरंगाबादकरांच्या या मागणीचा जोर आणखीनच वाढला. नुकतेच दोन दिवसांचे लाक्षणीक उपोषणही करण्यात आले. त्या दबावाचा परिणाम म्हणून मुख्यमंत्री फडणवीस यांनी औरंगाबाद येथे स्कूल ऑफ प्लानिंग अ‍ॅण्ड आर्किचेक्चर (स्पा) ही केंद्रीय संस्था देण्याची घोषणा आज विधिमंडळात केली. ही संस्थाही केंद्र सरकारचीच असून आयआयएम इतकीच प्रतिष्ठेची मानली जाते. त्यामुळे औरंगाबादकरांनी आयआयएमचा आग्रह सोडावा, असा संदेशच फडणवीस यांनी ही संस्था औरंगाबादसाठी जाहीर करून दिला आहे.

...तर ठरेल तिसरी संस्था
एसपीए ही संस्था याआधी भोपाळ व विजयवाडा येथे स्थापन झाली आहे. भोपाळला ५० एकर, तर विजयवाडात २५ एकरावर ती उभारण्यात आली आहे. असे असले तरी किमान १५ एकर जागा संस्थेसाठी आवश्यक असते. याआधी संस्था सुरू करण्यासाठी भोपाळला ८० कोटी आणि विजयवाडाला २५० कोटी रुपये केंद्र सरकारने दिले आहेत. दोन्ही संस्थांमध्ये प्रत्येकी ८० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. संस्थेतून पदवी व पदव्युत्तर पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्‍यांना जागतिक पातळीवर मान्यता मिळते. किमान २०० जणांचा स्टाफ एका संस्थेसाठी आवश्यक असतो, अशी माहिती इंडियन इन्सिट्यूट ऑफ आर्किटेक्चरचे औरंगाबादचे अध्यक्ष अजय ठाकूर यांनी दिली.

आयआयएमचा आग्रह राहीलच
मी कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त बाहेर आहे. त्यामुळे माझे या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी आज बोलणे झालेले नाही. तरीही औरंगाबादला आयआयएम मिळाली पाहिजे. हे त्यांना आधीच सांगितलेले आहे. स्पा दिली म्हणजे आयआयएम देणार नाहीत, असा अर्थ काढणे योग्य होणार नाही.
अतुल सावे, आमदार, औरंगाबाद पूर्व