आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमा कंपन्यांच्या नावाखाली 950 कोटींची हेराफेरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - ‘भारतीय रिझर्व्ह बँकेने कडक निर्बंध घातल्याने एलआयसीसह अनेक विमा कंपन्यांचे प्लान बंद झाले आहेत. तुमचा विमा प्लानही बंद झाला आहे. त्याच्या मॅच्युरिटीची रक्कम संबंधित विमा एजंट किंवा कंपनीला मिळू शकते. तसे होऊ द्यायचे नसेल, तर अमूक रक्कम बँकेच्या या खात्यामध्ये भरा’, असे कॉल्स करून बनवाबनवी करणार्‍यांनी थोडी थोडकी नव्हे, तर तब्बल साडेनऊशे कोटी रुपयांची हेराफेरी केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

अमरावतीमधील काही विमाधारकांनाही याबाबत अनेक ‘फेक कॉल्स’ प्राप्त झालेत. त्यांनी रीतसर तक्रारी केल्यानंतर विमा जगतात चांगलीच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, हे सर्व कॉल्स दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, बिहार, उत्तराखंड येथून विमाधारकांना येत आहेत. केवळ अमरावतीमधील विमाधारकांना हे कॉल्स प्राप्त झाले असे नाही, तर देशभरात भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी), आरआयआयसह सहा खासगी नामांकित विमा कंपन्यांच्या विमाधारकांनादेखील हे कॉल्स प्राप्त झाले आहेत. भारतीय आयुर्विमा महामंडळाने या तक्रारींची दखल घेत तातडीने कारवाई सुरू केली.

एलआयसीच्या सुमारे एक हजारावर विमाधारकांना वेगवेगळ्या ठिकाणांहून मिळालेल्या कॉल्सनुसार, त्यांना मॅच्युरिटीची रक्कम हवी असल्यास वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पाच ते सात हजार रुपये जमा करण्यास सांगण्यात आले, तर खासगी कंपन्यांच्या विमाधारकांना वेगवेगळ्या सरकारी विमा कंपन्यांच्या नावाने फोनवरून तब्बल दीडशे कोटी रुपयांची ठगवण्यात आले आहे. याबाबत अद्याप एकही अधिकृत तक्रार पोलिसांत दाखल न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतरदेखील बहुतांश विमाधारक केवळ एजंट किंवा संबंधित कंपनीकडेच तक्रार करीत आहेत. कोणताही विमाधारक का कुणास ठावूक, पोलिसांत जाण्यास तयार नाही.

एलआयसीच्या ग्राहकांना सर्वाधिक कॉल्स : बनावट कॉल्स करणार्‍यांनी भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या ग्राहकांना सर्वाधिक लक्ष्य केले आहे. राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी सुमारे एक हजार 200 विमाधारकांना असे कॉल्स प्राप्त झाले आहेत. त्यापैकी काही जण या ठगांच्या पाशात अडकले. ज्या खासगी विमा कंपन्यांच्या नावाने हे कॉल्स आले होते, त्यांच्याकडेही एलआयसीने तक्रार केली. परंतु, त्या कंपन्यांकडून कोणताही कॉल किंवा संपर्कच करण्यात आलेला नाही, असे स्पष्ट झाले आहे.

माहितीची चोरी : फसवणूक करणार्‍या या टोळीने वेगवेगळ्या विमा कंपन्या, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड कंपन्यांशी संबंधित सुमारे 24 हजार ग्राहकांची माहिती असलेल्या डेटा चोरला असावा, असा संशय विमा कंपनीतील एका जबाबदार सूत्राने व्यक्त केला. जोवर चोरी झाल्याचे अधिकृत पुरावे आणि चोरी करणारा सापडत नाहीत, तोवर नागरिकांना सांभाळून राहण्याचे आवाहन करण्याशिवाय पर्यायच नाही, असे या अधिकार्‍याने नमूद केले.

तातडीने दाखल करा तक्रार
एलआयसीच्या काही विमाधारकांना असे कॉल्स आले आहेत. एलआयसीने असे कोणतेही कॉल्स केलेले नाहीत. ग्राहकांनी अशा कॉल्सला दाद देऊ नये. कोणत्याही खात्यात पैसे भरू नये. उलट असे कॉल्स आल्यास तातडीने जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करावी व त्याची प्रत जवळच्या एलआयसी कार्यालयात द्यावी.’’ शुभाशीष दासगुप्ता, वरिष्ठ विभागीय प्रबंधक, एलआयसी