आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टायपेंडसाठी इंटर्नशिप डॉक्टर्स ऑन स्ट्राइक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - विद्यावेतन देण्यात यावे, यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातील इंटर्नशिप करणारे डॉक्टर्स पाच दिवसांपासून अधिष्ठाता कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करीत आहेत. जवळपास 50 डॉक्टर्स संपावर आहेत.

व्यवस्थापनाने गांभीर्याने विचार न केल्यास सध्या अहिंसेच्या मार्गाने सुरू असलेले आंदोलन हिंसक होऊ शकते, असा इशाराही डॉक्टर्सनी दिला आहे. रुग्णालयात मागील चार महिन्यांपासून काम करूनही अद्यापही विद्यावेतन दिले नाही. तीन आठवड्यांपूर्वी अधिष्ठाता यांच्याकडे अर्ज करूनही यावर तोडगा निघालेला नाही, असेही डॉक्टरांनी सांगितले. अधिष्ठाता व रुग्णालय व्यवस्थापन डॉक्टरांचा ‘फुटबॉल’ करून टोलवाटोलवी करत आहेत. अद्यापही व्यवस्थापन व अधिष्ठाता यांनी डॉक्टरांची भेट घेतली नाही, असेही नमूद केले. रुग्णालयात इंटर्नशिप करणारे डॉक्टर्स आंदोलनात सहभागी झाले आहेत.

डॉक्टरांनी वाचला समस्यांचा पाढा
फी वाढीसंदर्भात डॉक्टरांना न विचारताच नोटीस लागते. मुदतीत ते पैसे न भरल्यास दंड वसूल करण्यात येतो. आंदोलन मागे न घेतल्यास इंटर्नशिपची मुदत वाढवू किंवा कारवाई करण्याचा धाक दाखवला जातो. मात्र, कोणत्याच मुद्द्यावर व्यवस्थापन किंवा अधिष्ठाता चर्चा करत नाही, असेही या आंदोलक डॉक्टर्सनी सांगितले.

यांना मिळतेय विद्यावेतन
व्हेटरनरी डॉक्टर्ससह इतर जणांना मिळणार्‍या स्टायपेंडबाबत डॉक्टरांनी व्यवस्थापन तथा अधिष्ठाता यांना पुरावे सादर केले आहेत. यामध्ये दंतवैद्यकीय महाविद्यालय व महाविद्यालयातील कर्मचारी यांचा समावेश आहे. मात्र, व्यवस्थापन खासगी महाविद्यालयात विद्यावेतन दिले जात नसल्याचेच सांगत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
फलकांनी वेधले लक्ष
मागण्यांच्या पूर्ततेसाठी विद्यार्थ्यांनी विविध फलकांच्या माध्यमातून लक्ष वेधून घेतले आहे. ‘डॉक्टर्स आॅन स्ट्राइक’, ‘वी वाँट स्टायपेंड’, ‘डोक्यावर आहे कामाचा भार, अब की बार छह हजार’, ‘वी वर्क, वी वाँट स्टायपेंड’, ‘पगार नाही, काम नाही’, अशा आशयाची फलके घेऊन हे विद्यार्थी घोषणाबाजी करत अधिष्ठाता कार्यालयासमोर ठाण मांडून बसले आहेत.
मुद्दा विचाराधीन आहे
इंटर्नशिप प्रशिक्षणाचाच एक भाग असल्याने अभ्यासक्रमात त्याचा समावेश आहे. त्याशिवाय विद्यार्थ्यांना पदवी देता येत नाही. खासगी महाविद्यालयात इंटर्न डॉक्टर्सना विद्यावेतन दिले जात नाही. ही मागणी व्यवस्थापनाकडे विचाराधीन असून, बैठकीनंतर निर्णय घेण्यात येणार आहे.
डॉ. दिलीप जाणे, अधिष्ठाता, डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय, अमरावती.