आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठ दिवसांत कामावर रुजू न झाल्यास अभियंते निलंबित, सुनील तटकरे यांचा इशारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - विदर्भ सिंचन विकास महामंडळात बदली झाल्यावर रुजू न होणार्‍या अभियंत्यांचा येत्या दोन दिवसांत आढावा घेतला जाईल. अभियंते आठ दिवसांत बदलीच्या जागेवर रुजू न झाल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल, अशी माहिती जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी दिली. ‘दिव्य मराठी’च्या वृत्ताची दखल घेऊन हा निर्णय घेण्यात आला.

विदर्भ सिंचन विकास महामंडळात अधिकार्‍यांची 25 टक्क्यांच्या वर पदे मागील दोन वर्षांपासून रिक्त आहेत. बदली झालेल्या 70 हून अधिकार्‍यांनी बदलीच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून रुजू होण्यास नकार दिला. त्याचा फटका महामंडळाला व पर्यायाने विदर्भातील सिंचन प्रकल्पांना बसत आहे. ‘दिव्य मराठी’ने वृत्ताच्या माध्यमातून याकडे लक्ष वेधल्यावर जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी त्याची गंभीर दखल घेतली. ‘दिव्य मराठी’शी बोलताना तटकरे यांनी सांगितले की, अनेक महामंडळांना सध्या ही समस्या भेडसावत असून, काही महामंडळांमध्ये ती जास्त गंभीर आहे.

मुळात मनुष्यबळच कमी असल्याने आम्ही एमपीएससीच्या माध्यमातून भरतीचे प्रयत्न करणार आहोत. मात्र, बदली झालेले आणि त्यानंतरही रुजू न होणार्‍या अभियंत्यांचा येत्या दोन दिवसांत आढावा घेतला जाणार आहे. त्यांना फार तर आठ दिवसांची मुदत दिली जाईल. आठ दिवसांत रुजू न झाल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.