अमरावती - पेढी नदीपात्राचे रुंदीकरण व खोलीकरणाचे काम मंजूर झाल्यावरही ते अतिशय संथगतीने सुरू असल्याचा आरोप करत वलगाव, रेवसा येथील संतप्त नागरिकांनी बुधवारी (दि. 25) जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता डी. सी. रामटेके यांच्या दालनात तोडफोड केली.
वलगाव, रेवसा, कामुंजा, दोनद व परिसरातील गावकर्यांना पेढी नदीपासून धोका आहे. 2007 मध्ये झालेल्या अतिवृष्टीने या गावांतील गावकर्यांचे मोठे नुकसान झाले होते. यंदाच्या पावसात पाणी येण्यापूर्वी नदीपात्राचे खोलीकरण आणि रुंदीकरण करणे आवश्यक आहे. यासाठी शासनाकडून चार कोटी रुपये मंजूर आहेत. मात्र, प्रत्यक्षात कामाची गती अतिशय संथ आहे. जलसंपदा पाटबंधारे विभागाच्या यांत्रिकी विभागाकडे संबंधित कामासाठी आवश्यक असलेली मशिनरी पुरवण्याची आणि काम करण्याची जबाबदारी आहे. मात्र,
कामाची संथगती, कार्यकारी अभियंत्याकडून गावकर्यांना योग्य वागणूक मिळत नसल्याचा गावकर्यांचा आरोप आहे.
वलगाव, रेवसा व परिसरातील नागरिक बुधवारी यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता डी. सी. रामटेके यांच्याकडे चर्चेसाठी गेले होते. पावसाळ्याला सुरुवात झाल्यावरही काम अशा प्रकारे का सुरू आहे, हाच जाब विचारण्यासाठी गावकरी कार्यालयात आले असता, कार्यकारी अभियंता रामटेके कार्यालयात हजर नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे संतप्त गावकर्यांनी रामटेके यांच्या कक्षातील फर्निचर, खुर्चीची तोडफोड केली. रामटेके यांची खुर्ची कार्यालयाबाहेर फेकत त्यांनी राग व्यक्त केला.
या आंदोलनामध्ये वलगावचे सरपंच अ. करीम अ. जलील, वैभव वानखडे, प्रकाश बनारसे, नितीन कटकतलवारे, संतोष रामटेके, नीलेश खोब्रागडे, राजू कुरकेकर, राजू निर्मळ यांच्यासह अन्य गावकरी सहभागी झाले होते.
केवळ पाच लाखांचा निधी मिळाला, कसे करणार काम?
४हे काम करण्यासाठी आम्हाला केवळ पाच लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. या निधीमध्ये एक आठवडासुद्धा काम होऊ शकत नाही. मात्र, तरीही आम्ही काम सुरू केले आहे. बुधवारी नेमके काय झाले, मला माहीत नाही. मी नागपूरला कार्यालयीन कामासाठी आलो आहे.
(फोटो - डी. सी. रामटेके,कार्यकारी अभियंता, (यांत्रिकी विभाग, पाटबंधारे जलसंपदा विभाग)
गावकर्यांनी रामटेके यांच्या दालनातील त्यांची खुर्ची कार्यालयाबाहेर फेकत राग व्यक्त केला)