छायाचित्र: विधिमंडळात प्रवेश करणा-या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनीही ‘घड्याळा’चे महत्त्व अधोरेखित केले.
नागपूर - राज्यात १८८ तालुक्यांतील २२३४ गावांत भूगर्भातील पाण्याच्या पातळीत दोन मीटरपेक्षा अधिक घट झाली आहे. सद्य:परिस्थितीत २२ जिल्ह्यांतील १९,०५९ गावांत टंचाईसदृश स्थिती आहे. ही परिस्थिती दूर व्हावी आणि महाराष्ट्र यापुढे तहानलेला राहू नये, यासाठी राज्यात जलयुक्त शिवार अभियान राबवण्यात येणार आहे, अशी माहिती ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.
सन २०१२-१३ मध्ये टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील पाच गावांत जलयुक्त गाव अभियान राबवण्यात आले. या पाच गावांत आज पाणीटंचाई नावालाही नाही. त्यातूनच ही योजना आकाराला आली. या योजनेसाठी साखळी सिमेंट काँक्रीट नाला बांध कार्यक्रम, महात्मा फुले जल व भूमी संधारण अभियान, गाळ काढणे, विहीर पुनर्भरण आदी सर्व योजना एकत्रित केल्या. या योजनेसह इतर योजनांच्या कालबद्ध विकासाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयांतर्गत मुख्यमंत्री ट्रान्सफार्मेशन ऑफिस सुरू केल्याचे मुंडे यांनी सांगितले. नाशिक विभागात १७८२, औरंगाबाद विभागात ८००४, अमरावती ७२४१ व नागपूर विभागात २०२९, अशी एकूण राज्यात १९,०५९ गावे टंचाईग्रस्त असल्याचे त्या म्हणाल्या.
पाण्याचाही ताळेबंद
यापुढे राज्यातील प्रत्येक गावातील पाण्याचा ताळेबंद ठेवण्यात येईल. शेतीसाठी, जनावरांसाठी तसेच पिण्यासाठी नेमके किती पाणी लागते याचा अभ्यास करण्यात येऊन सरकारच्या वतीने त्याचा आराखडा आखण्यात येईल. गावात पाऊस किती पडतो, त्यातील किती पाणी वाहून जाते याचा तज्ज्ञांद्वारे अभ्यास करण्यात येईल. येत्या तीन महिन्यांत संपूर्ण कामे पूर्ण करण्यात येईल. डिसेंबर २०१४ ते जानेवारी २०१६ अशी वर्षभर योजना राबवल्यानंतर वार्षिक आढावा घेण्यात येईल. कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्र तहानलेला राहणार नाही याची काळजी घेऊ, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.