आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साईबाबा, गजानन महाराज यांना संत कसे म्हणावे; जांबुवंत धोटे यांची मुक्ताफळे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - ‘शिर्डीचे साईबाबा, शेगावचे संत गजानन महाराज आणि नागपूरचे ताजुद्दीनबाबा या तिघांनी समाजाला कुठलीच शिकवण दिली नाही. त्यांचा संस्कार आणि संस्कृतीशी कुठलाही संबंध नाही. शेगाव, शिर्डी आणि नागपूरचा ताजुद्दीनबाबांचा दर्गा ही तथाकथित भक्तीची केंद्रे गुंड आणि बदमाशांचे अड्डे असून शासनाने या संस्थानांचा ताबा घ्यावा, तेथील कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त करावी,’ अशी मुक्ताफळे विदर्भाचे नेते व माजी खासदार जांबुवंतराव धोटे यांनी उधळली.

नागपुरात पत्रकार परिषदेत धोटे यांनी ही मुक्ताफळे उधळल्यावर ‘दिव्य मराठी’शी बोलताना त्यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांचा पुनरुच्चार केला. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, संत नामदेव, सर्मथ रामदास स्वामी, संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी समाजाचे खर्‍या अर्थाने प्रबोधन केल्याने ते संत आहेत. मात्र, आम्ही खोटे देव उभे करून खरे पायदळी तुडवले, असा दावा धोटे यांनी केला.

‘साईबाबा, गजानन महाराज आणि ताजुद्दीनबाबा यांनी समाजाला कुठलीच शिकवण दिली नाही. त्यांचा संस्कार आणि संस्कृतीशी कुठलाच संबंध राहिलेला नाही. त्यांनी गांजा पिण्याची व चमत्कारातून अंधश्रद्धेची शिकवण समाजात पसरवली. ताजुद्दीनबाबा मनोरुग्णालयात राहायचे. गजानन महाराज कपडे घालत नव्हते. त्यामुळे ते संत कसे?’ असा प्रश्न धोटे यांनी उपस्थित केला.

‘मनुष्य हा मुळातच अंधश्रद्धाळू आहे. माणसाला चमत्कार आवडतात. त्यामुळे आम्ही खरे संत बाजूला ठेवून पागल आणि गांजा पिणार्‍यांवर आम्ही श्रद्धा ठेवली. अशाच अंधश्रद्धेतून माणूस माणसाला मारतो. प्राण्यांचा बळी दिला जातो. या अंधश्रद्धेला कुठेतरी शह बसला पाहिजे.

शासनाने अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा केला आहे. तो केवळ पुस्तकात राहता कामा नये,’ अशी मागणी करून धोटे यांनी शेगाव, शिर्डी आणि ताजुद्दीनबाबांचा दर्गा हे गुंड आणि बदमाशांचे अड्डे आहेत, असा आरोपही केला. या केंद्रांवर अनेक अनैतिक प्रकार चालतात. दानधर्माच्या नावावर कोट्यवधी रुपयांचा काळा पैसा जमा होतो. भ्रष्टाचारी लोकांनी तो जमवलेला असतो. अनेकांनी या संतांना आपल्या उद्योगांमध्ये भागीदार केले आहे. त्यामुळे सरकारने या संस्थानांचा ताबा घेऊन तेथील संपत्ती जप्त करावी. पैशाची चौकशी करून तो पैसा आत्महत्याग्रस्त शेतक री कुटुंबांच्या कल्याणासाठी वापरावा, अशी मागणी धोटे यांनी केली.

मला बोलण्याचा अधिकार
कुणाच्याही भावना दुखावण्याचा तुम्हाला काय अधिकार, या प्रश्नावर बोलताना धोटे म्हणाले, मला अधिकार आहेच. कारण मी समाजसेवक आहे. लोक चुकीच्या मार्गाने जात असतील, तर सत्य सांगून त्यांना योग्य मार्गावर नेण्याचे माझे काम आहे. सॉक्रेटिससारख्या तत्त्ववेत्त्यालादेखील सत्यासाठी विष घ्यावे लागले होते, असा अफलातून दावाही धोटे यांनी केला.

(फोटो - जांबुवंतराव धोटे)